गॅस सिलिंडर ग्राहकांनो सावधान! केवायसी अपडेटच्या नावाखाली सायबर भामट्यांचा नवा डाव; बँक खाते होऊ शकते रिकामे

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

एलपीजी गॅस बुकिंग आणि सबसिडीच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून सायबर फसवणूक केली जात आहे. या नव्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी आणि तक्रार कोठे करावी, जाणून घ्या सविस्तर माहिती.

स्थैर्य, सातारा, दि. २४ नोव्हेंबर : घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी आता गॅस बुकिंग आणि सबसिडीचा नवा मार्ग निवडला आहे. केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅस सबसिडी बंद होईल, अशी भीती दाखवून ग्राहकांना बनावट संदेश आणि लिंक पाठवल्या जात आहेत. या फसवणुकीच्या प्रकारांबाबत बँकांकडूनही ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

फसवणुकीचा सापळा नेमका कसा रचला जातो?

सायबर भामटे सर्वप्रथम ग्राहकांना फोन करून संबंधित गॅस एजन्सीमधून बोलत असल्याचे भासवतात. तुमची केवायसी पूर्ण नसल्यामुळे किंवा अपडेट न केल्यास सिलिंडरची सबसिडी तात्काळ बंद होईल, असे सांगून ग्राहकांमध्ये भीती निर्माण केली जाते. त्यानंतर व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे एक बनावट लिंक किंवा ‘APK’ फाईल पाठवून ती डाउनलोड करण्यास सांगितले जाते. ही फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल होताच त्यातील मालवेअरद्वारे वैयक्तिक माहिती आणि बँकिंग तपशील चोरून ग्राहकांचे बँक खाते रिकामे केले जाते.

फसवणूक टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी?

सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी ग्राहकांनी गॅस सबसिडी किंवा केवायसी अपडेटच्या नावाने आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. तसेच, व्हॉट्सॲप किंवा मेसेजवर आलेल्या अनोळखी फाईल्स कधीही डाउनलोड करू नयेत. गॅस बुकिंग किंवा केवायसीसाठी संबंधित कंपनीचे अधिकृत मोबाईल ॲप, अधिकृत वेबसाइट किंवा थेट गॅस एजन्सीशी संपर्क साधावा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत ओटीपी (OTP), एटीएम पिन किंवा कार्डचा सीव्हीव्ही क्रमांक शेअर करू नये.

फसवणूक झाल्यास तात्काळ येथे तक्रार करा

चुकून कोणत्याही लिंकवर क्लिक होऊन आर्थिक फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तात्काळ १९३० (1930) या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, केंद्र सरकारच्या ‘cybercrime.gov.in’ या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवल्यास गेलेली रक्कम वाचवण्यास मदत होऊ शकते.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!