
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यात यंदाच्या तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने केंद्र सरकारकडे सुमारे ५७ हजार कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची मागणी केली आहे. या प्रस्तावामध्ये दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ३५ हजार कोटी तर पूरक उपाययोजनांसाठी २२ हजार कोटी रुपयांचा समावेश आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०४ नोव्हेंबर : अलनिनोच्या प्रभावामुळे राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळ पडला असून, प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचे पंचनामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत. आतापर्यंत एक कोटी २७ लाख शेतकऱ्यांचे पंचनामे झाले असून, ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपयांची अग्रिम मदत डीबीटी प्रणालीद्वारे देण्यास सुरुवात झाली आहे. दीड कोटी शेतकऱ्यांसाठी ७ हजार ५०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
एनडीआरएफ निकष आणि विशेष उपाययोजना
नुकसान भरपाईसाठी केंद्र शासनाच्या निकषानुसार ३५ हजार कोटींची मागणी करण्यात आली आहे, ज्यामध्ये पीक नुकसान, चारा छावण्या आणि पाणी पुरवठा या प्रमुख बाबींचा समावेश आहे. याशिवाय, एनडीआरएफच्या निकषात न बसणाऱ्या कामांसाठी २२ हजार कोटींच्या विशेष निधीची मागणी करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार ३.० अभियानांतर्गत ५०० कोटींची तरतूद करण्यात आली असून गाळ काढणे आणि पर्यायी पाणी पुरवठा योजनांना गती दिली जात आहे.





