
थेट WhatsApp वर मिळवा
निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल करत ऑनलाईन फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) संदर्भातील घोषणापत्र हटवले आहे, ज्यामुळे नवीन मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ०४ नोव्हेंबर : देशातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून (SIR) सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार, आता ऑनलाईन फॉर्म ६ मधून एसआयआर संदर्भातील घोषणापत्र पूर्णपणे हटवण्यात आले आहे. यामुळे नवीन मतदारांना नोंदणी करताना पूर्वजांच्या जुन्या मतदार यादीतील नोंदीची अतिरिक्त माहिती देण्याची गरज उरलेली नाही.
नोंदणी प्रक्रिया झाली सोपी
यापूर्वी नवीन मतदारांना फॉर्म ६ भरताना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे किंवा पूर्वजांचे नाव जुन्या मतदार यादीत असल्याबाबतची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले होते. या जाचक अटीमुळे नोंदणी प्रक्रिया किचकट झाली होती आणि सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आयोगाच्या या नवीन बदलामुळे प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत झाली असून नवीन मतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.





