दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार पाच हजार रुपये

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यात भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत आणखी ४० तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले असून, यामुळे राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३०५ वर पोहोचली आहे. या सर्व भागांमधील शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात दिलासा देण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे तातडीचे अग्रिम अनुदान दिवाळीपूर्वी थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १४ ऑक्टोबर : पावसाच्या लहरीपणामुळे आणि अपुऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील माहिती देताना सांगितले की, याआधी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला होता, मात्र विविध भागांतून प्राप्त झालेल्या मागण्या आणि अहवालांच्या पुनरावलोकनानंतर आणखी ४० तालुके या यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मदतीचा हात

शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू नये, यासाठी सरकारने यंदा नियमांमध्ये बदल करत वेळेपूर्वीच दुष्काळ जाहीर केला आहे. केंद्रीय मदतीची प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागत असल्याने राज्य शासनाने स्वतःहून पावले उचलत शेतकऱ्यांना दिलाса देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार दुष्काळग्रस्त ३०५ तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पाच हजार रुपयांची मदत जमा केली जाणार आहे.

पिण्याच्या पाण्याची आणि चारा उपलब्धतेची विशेष तयारी

ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याचा साठा आरक्षित ठेवण्यात आला असून, टँकरद्वारे होणाऱ्या पुरवठा व्यवस्थेवर जीपीएसद्वारे (GPS) कडक नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!