
थेट WhatsApp वर मिळवा
राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती पाहता राज्य सरकारने मोठा निर्णय घेत आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, त्यामुळे राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३०५ वर पोहोचली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १५ ऑक्टोबर : पावसाळ्यातील अपुऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची दखल घेत शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत वाढ केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला होता, मात्र स्थानिक पातळीवरील तक्रारी आणि आढाव्यानंतर आणखी ४० तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम रक्कम जमा
दुष्काळाच्या या कठीण काळात शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक आधार मिळावा यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यानुसार दिवाळीपूर्वी राज्यातील सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत थेट जमा केली जाणार आहे. तसेच या ३०५ तालुक्यांसाठी शासनाचे १२ महत्त्वाचे मदतविषयक नियम व सवलती लागू करण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी प्रशासनाला कडक निर्देश
दुष्काळग्रस्त भागातील बँका किंवा सहकारी संस्थांकडून शेतकऱ्यांवर कर्जाच्या वसुलीसाठी दबाव टाकला जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय वीज बिल वसुलीवरही निर्बंध आणण्यात आले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनधिकृत जलवाहिन्यांवर कारवाई मोहीम तीव्र करण्यात आली आहे.





