
थेट WhatsApp वर मिळवा
पुण्यातील भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेच्या (आयआयटीएम) ‘इंडक्लिम’ अभ्यासानुसार, २१०० पर्यंत भारताचे तापमान ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढून मान्सूनच्या पावसातही वाढ होण्याची शक्यता आहे.
स्थैर्य,सातारा, दि. २६ नोव्हेंबर : जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर शतकाच्या अखेरीस म्हणजेच २१०० पर्यंत भारताच्या हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक उत्सर्जनाच्या परिस्थितीत देशाच्या सरासरी आणि कमाल तापमानात सुमारे तीन अंश सेल्सिअस, तर रात्रीच्या किमान तापमानात चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर मान्सूनच्या पावसाच्या प्रमाणातही वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. पुण्यातील भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेने (आयआयटीएम) विकसित केलेल्या ‘इंडक्लिम’ या उच्च अचूकतेच्या हवामान माहिती संचातून हे महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर आले आहेत.
रात्रीच्या तापमानात अधिक वेगाने वाढ होणार
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आयआयटीएमच्या हवामान बदल संशोधन केंद्राने ‘आयआयटीएम-ईएसएम’ प्रणालीवर आधारित हा माहिती संच तयार केला आहे. डॉ. संदीप नारायणसेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्य असवाले, प्रितम दास महापात्रा, शामल मराठे आणि अन्य शास्त्रज्ञांच्या पथकाने यावर संशोधन केले आहे. विविध उत्सर्जन परिस्थितींच्या अभ्यासानुसार, कमी उत्सर्जनाच्या स्थितीत तापमानवाढ एक अंश, मध्यम उत्सर्जनात दीड अंश, तर सर्वाधिक उत्सर्जनात तीन अंशांपर्यंत पोहोचू शकते. रात्रीचे किमान तापमान दिवसाच्या कमाल तापमानापेक्षा अधिक वेगाने वाढणार असल्याने दिवस आणि रात्रीच्या तापमानातील तफावत कमी होण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
अचूक माहिती संचामुळे आपत्ती व्यवस्थापनाला मदत
मूळ हवामान प्रारूपांतील प्रादेशिक त्रुटी दूर करण्यासाठी शास्त्रज्ञांनी १९५० ते २०१४ या कालावधीतील ऐतिहासिक नोंदी आणि २०१५ ते २०९९ या कालावधीतील अंदाजांचा समावेश असलेला उच्च विभेदन क्षमतेचा संच तयार केला आहे. या प्रक्रियेमुळे पश्चिम घाट, मध्य भारत, ईशान्य भारत आणि हिमालयातील हवामान अंदाजातील त्रुटी लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत. नासा-नेक्स आणि आयसिमिपच्या तुलनेत या संचात अधिक अचूकता आढळली असून, अतिवृष्टीचे दिवस आणि उष्णतेच्या लाटांचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. शेती, जलसंपदा व्यवस्थापन, शहरी नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी धोरणकर्त्यांना या माहिती संचाचा मोठा उपयोग होणार आहे.



