
सातारा तालुक्यातील कुमठे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना’अंतर्गत शेकडो लाभार्थ्यांना विविध साहित्य आणि दाखल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रशासनाला तळागाळापर्यंत पोहोचण्याच्या सूचना दिल्या.
स्थैर्य, सातारा दि. 20 : राज्यातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना विविध सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सरकारने अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची प्रशासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करून त्याचा लाभ थेट तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम काटेकोरपणे करावे. तसेच, जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम करावे, असे महत्त्वपूर्ण आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
कुमठे येथे ‘महाराजस्व अभियाना’ला मोठा प्रतिसाद
सातारा तालुक्यातील कुमठे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना’अंतर्गत शासनाच्या विविध विभागांतील लाभांचे, साहित्याचे व दाखल्यांचे वाटप ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या सदस्या पूजा मोरे, सातारा पंचायत समितीचे सभापती महेश गाडे, सदस्या प्रमिला सुतार, कोमल दळवी, सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, अरुण कापसे, सुरेंद्र देशपांडे, अरविंद चव्हाण, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव सावंत, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक तुषार पाटील, कृषी विभागाचे ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेकडो लाभार्थ्यांना एकाच छताखाली विविध योजनांचा लाभ
या अभियानांतर्गत परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला. खालीलप्रमाणे विविध दाखले, प्रमाणपत्रे आणि साहित्यांचे वाटप यावेळी करण्यात आले:
-
महसुली व जमिनीचे दाखले : आष्टे येथील पुनर्वसित गावठाणातील भूखंड (भूधारण प्रकार वर्ग २ चे वर्ग १ करून) १०५ लाभार्थ्यांना ७/१२ व फेरफार वाटप, कातकरी दाखले (५१), वारस नोंदी (५६), ७/१२ दुरुस्ती (७), अपाक कमी करणे (९), बोजा कमी करणे (५), एकुम कमी करणे (५), लक्ष्मी मुक्ती योजना (२) आणि भूमी अभिलेख विभाग (१५).
-
नागरी सुविधा व प्रमाणपत्रे : शाळकरी मुलांचे अधिवास प्रमाणपत्र (४०५), डिजिटल रेशनकार्ड वाटप (२४०), आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती (४७).
-
आरोग्य व सामाजिक सुरक्षा : एसटी महामंडळाच्या महिला सन्मान योजनेंतर्गत बस पासेस (१४२), नेत्र तपासणी (११९), आरोग्य तपासणी (६०), रक्तदान शिबिर (१५), संजय गांधी निराधार योजना (१५), श्रावण बाळ योजना (१०).
-
कृषी, बालविकास व इतर वाटप : कृषी विभागांतर्गत ट्रॅक्टर व अवजार वाटप (२६), एकात्मिक बालविकास अंतर्गत बेबी केअर किट वाटप (३५), कॅनरा बँक सीएसआर फंडातून सायकल वाटप (१२), पशुवैद्यकीय विभागांतर्गत जंतुनाशक गोळ्या वाटप (५६), जिल्हा मध्यवर्ती बँक (१०) आणि वन विभागाशी संबंधित (४) लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

