दैनिक स्थैर्य | दि. १७ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
भारतीय परंपरेतील साहित्य हे मौखिक पद्धतीने एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे येत गेले. संत साहित्य, जात्यावरच्या ओव्या, भारूड, पारंपरिक लोकगीत यांचा समृद्ध वारसाही मौखिक रूपाने एका पिढीने दुसर्या पिढीला दिला. मुद्रणकलेचा शोध लागल्यानंतर मुद्रित स्वरूपात पुस्तकांच्या रूपाने आपल्याला हे ज्ञान वाचण्यास मिळाले. पुस्तकांच्या रूपाने आपल्याला जुन्या व नव्या पिढीतील ज्ञानाची माहिती मिळाली. हे अक्षरधन खूप मोलाचे असून ते आजच्या तरुण पिढीने वाचले पाहिजे आणि जपले पाहिजे, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.
अहिल्यानगर (पणदरे) येथील जयभवानी तरुण मंडळ आयोजित शारदीय नवरात्र व्याख्यानमालेतील ‘वाचनसंस्कृती’ या विषयावरील पहिले पुष्प गुंफताना बेडकिहाळ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध ग्रामीण कथाकार प्रा. रविंद्र कोकरे होते.
बेडकिहाळ पुढे म्हणाले, आधुनिक काळातील सोशल मिडीयाच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृतीवर आघात होत आहे. तरीपण तरुण पिढी वाचतच नाही, हे म्हणणे संयुक्तीक ठरणार नाही. या पिढीची वाचनाची आवड बदलली असली तरी ई-बुकच्या माध्यमातून ही पिढी नवीन पुस्तके वाचत आहे. वाचनाची आवड आपले मन संस्कारित करते. त्याचबरोबर सर्वांगीण विचार करण्याची क्षमताही विकसित करते. म्हणून आपण वाचले पाहिजे.
मंडळाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कोकरे म्हणाले, ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवणे ही काळाची गरज आहे. वाचन ही मानसिक भूक असून दर्जेदार पुस्तके तरुणाईची मस्तक घडविणार आहेत.
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. कलाम जयंतीनिमित्त दररोज वाचन सुरू आहे. पंचक्रोशीतील वाचक, विद्यार्थी, महिला भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित होते. मंडळाचे विश्वस्त नंदकुमार जाधव, आदेश कोकरे, भानुदास कोकरे, मधुकर कोकरे, बापूराव कोकरे, प्रदीप कोकरे, अमोल भिसे, विश्वनाथ कोकरे, महेश झोरे, सचिन कोकरे, नितीन कोकरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आबासाहेब कोकरे यांनी केले. आभार गणेश कोकरे यांनी मानले.