कोरोना चाचणीसाठी गेलेल्या युवतीच्या गुप्तांगाचा स्वॅब, लॅब टेक्निशियनला अटक


स्थैर्य, अमरावती, 30 : कोरोना संक्रमित रूग्णाच्या संपर्कातील 24 वर्षीय तरुणाच्या गुप्तांगातून स्वॅब घेणे प्रकरण आता चांगलेच पेटलं आहे. या प्रकरणी शिवसेना व एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये जाऊन तोडफोड केली आहे. संतप्त नगरसेवकांची हॉस्पिटलमधील साहित्याची तोडफोड केली. कॅबिनच्या काचा फोडल्या.

दुसरीकडे खासदार नवनीत राणा या देखील संतप्त झाल्या असून त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

24 वर्षीय तरुणीचा कोविड लॅबमध्ये गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर अमरावती जिल्हात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आता घटनेवर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. या घटनेनंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा चांगल्याच संतप्त झाले आहे. तर आता पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी मी रोडवर उतरणार असल्याचा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. महिला आधीच सक्षम झाल्या आहेत, त्यामुळे मी खासदार झाले तर देशाच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील झाल्यात, असेही नवनीत राणा म्हणाल्या. अमरावती येथील आरोग्य यंत्रणा पार ढासळली आहे. कोविड रुग्णांचे हाल होत आहे, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.

कडक कारवाई – ठाकूर

राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणी कडक कारवाई केल्याचं म्हटलं आहे.

“सबंधित लॅबमधील टेक्निशिअनवर कडक कारवाई करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेची 354, 376 दोन्ही कलमं लावण्यात आली आहेत. या टेक्निशिअनवर अशी कारवाई केली जाईल की पुन्हा असं कृत्य करायला कोणी धजावणार नाही. महिलांच्या छेडछाडीची, अपमानाची प्रकरणं सहन केली जाणार नाहीत,” असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

चित्रा वाघ यांचे सवाल

अतिशय संतापजनक घटना बडनेऱ्यात घडली आहे. मुलीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेण्यात आला आणि तेही सरकारी लॅबमध्ये. कशी काय त्या टेक्निशिअनची हिंमत झाली? तो त्या मुलीला असं कसं काय घेऊन गेला? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे सरकारने यासंदर्भात जनजागृती करणं आवश्यक आहे. स्वॅब टेस्टिंग फक्त आणि फक्त नाकाद्वारे घेतली जाते हे लोकांपर्यंत पोहोचवायला हवं, असं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

“क्वारंटीन सेंटरमध्ये महिला सुरक्षित नाहीत, लहान मुली सुरक्षित नाहीत. बाहेर नाहीत आणि आता तर लॅबमध्येही नाहीत. स्वॅब टेस्टिंगच्या नावावर कुठे कुठे काय काय घडत असेल? सरकारचं महिला सुरक्षेकडे लक्ष नाही. महिला सुरक्षेवर न थकता बोलणारे नेते कुठे आहेत आता? दिशा कायदा येणार होता त्याचं काय झालं? आणखी अशा किती घाणेरड्या वाईट घटना आमच्यासोबत घडल्यानंतर सरकार जागेवर येणार आहे,” असे सवाल वाघ यांनी विचारले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!