
खामगाव येथे विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी निष्काळजीपणा करणाऱ्या केबलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०९ जुलै : फलटण तालुक्यातील खामगाव येथे ८ जुलै रोजी पहाटे विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये केबलचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
निष्काळजीपणा नडला; केबलचालक निष्पन्न
खामगाव येथील सतीश शिंदे (वय ४५), गंगू शिंदे (वय ४०), सचिन शिंदे (वय २६) आणि आरती शिंदे (वय २४) या चार जणांचा लोखंडी तारेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या पुढील तपासामध्ये फिर्यादी शीतल शिंदे यांच्या घरावरून निष्काळजीपणाने केबल टाकण्यात आल्याचे समोर आले. या केबल वायरला जोडलेली लोखंडी सपोर्ट तार घरासमोर पडल्याने आणि त्याला स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडली. यावरून पोलिसांनी तपास करून संबंधित केबलचालक तात्यासो चंदर लांडगे (रा. खामगाव साखरवाडी, ता. फलटण) याला निष्पन्न केले आहे.
गुन्हा दाखल; पोलिसांचा पुढील तपास सुरू
फिर्यादी शीतल शिंदे यांनी दिलेल्या जबाबावरून संशयित केबलचालक तात्यासो लांडगे याच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी कोणाचा निष्काळजीपणा आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
