मतदान केंद्राबाहेर चोख पोलिस बंदोबस्त ठेवा; निवडणूक निरीक्षकांच्या जिल्हा प्रशासनाला सक्त सूचना


 


स्थैर्य, सातारा, दि.२२ : शिक्षक व पदवीधर निवडणूक शांततेत व पादर्शक पार पाडण्यासाठी मतदान केंद्राच्या बाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा, तसेच जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना निवडणूक निरीक्षक निलीमा केरकट्टा यांनी आज केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज शिक्षक व पदवीधर निवडूक तयारीचा आढावा निवडणूक निरीक्षक निलीमा केरकट्टा यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर आदी उपस्थित होते. शिक्षक व पदवीधर मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशा सूचना करुन श्रीमती केरकट्टा पुढे म्हणाल्या, मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे. आदर्श आचार संहितेचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता घेऊन या निवडणुका अत्यंत पारदर्शकपणे आणि शांततेत पार पाडाव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 

निवडणुकीविषयी तक्रार असल्यास संपर्क करा : शिक्षक व पदवीधर निवडणुकीसंबधी कोणाला काही तक्रारी करायची असल्यास 9405500565 या आपल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही निवडणूक निरीक्षक निलीमा केरकट्टा यांनी केले.

निवडणूक निरीक्षकांकडून मतदान केंद्राची पाहणी 

बैठकीनंतर निवडणूक निरीक्षक निलीमा केरकट्टा यांनी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील पदवीधर मतदारांसाठी असलेल्या 314 व 315 मतदान केंद्रास, तसेच आझाद महाविद्यालय येथील शिक्षक मतदरांसाठी असणाऱ्या 212 व 213 मतदान केंद्रास भेट देवून जिल्हा प्रशासनकडून मतदानासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी मतदारांमध्ये सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी, असे सांगून प्रत्येक मतदाराचे हात स्वच्छ धुण्याची किंवा सॅनिटायझ करण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी पाहणी दरम्यान केल्या. या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मतदान केंद्राची, मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. मतदानाच्या आदल्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. तसेच मतदान प्रक्रियेसाठी काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर देण्यात येणार असल्याचे सांगून पदवीधर व शिक्षक निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदारांनी मास्क लावून मतदान करण्यासाठी यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी केले. या बैठकीत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मतदानाच्या दिवशी ठेवण्यात येणाऱ्या पोलीस बंदोबस्ताची माहिती दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!