स्थैर्य, कराड, दि.२०: पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघात झालेल्या पराभवाची कारण मीमांसा नक्की काय आहे, त्याची भाजपच्या पहिल्या, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांसह नेत्यांशी संवाद साधून त्याची मीमांसा शोधण्याचे काम पक्षातर्फे येथे शनिवारी दिवसभर सुरू होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना वगळून सुरू असलेल्या बैठकीला पक्षीय पातळीवर मोठे महत्त्व आले आहे. त्यामुळे संघटन पातळीवर काही बदलाचे संकेतही मिळत आहेत. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण, पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे, पुणे पदवीधरचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख येथे त्यासाठी तळ ठोकून आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आहे.
भाजपच्या बैठकीला त्यांनी ग्रामपंचायत, महापालिका, पालिकांच्या निवडणुकांचीही जोड दिली आहे. त्यासाठी व्यक्तिगत व ग्रुप पातळीवर सरचिटणीस आमदार चव्हाण संपर्क साधत आहेत. संघटनमंत्री देशपांडे यांनी बैठकांचे नियोजन केले. मध्यवर्ती ठिकाण म्हणून कऱ्हाडची निवड झाली असली, तरी पक्षीय पातळीवर होणाऱ्या चिंतन बैठकीला प्रदेशाध्यक्ष पाटील यांची अनुपस्थिती बरेच काही सांगून जाते. पाचही जिल्ह्यांतील प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे समर्थक फारसे कोणी बैठकीकडे फिरकले नाहीत. सातारा जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांनी प्रदेश सरचिटणीसांना अर्ज पाठवून त्यांचे लेखी म्हणणे दिले आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतून भाजपचे पदाधिकारी भेटले आहेत. त्यामध्ये प्रदेशाध्यक्षांचे समर्थक नव्हते. मात्र, जे पदाधिकारी भेटले आहेत. त्यांनी सरचिटणीस आमदार चव्हाण यांना काही फिडबॅक दिला आहे. सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, युवा नेते अतुल भोसले, प्रवक्ते भरत पाटील यांच्यासह काही पदाधिकारी, कोल्हापूर जिल्ह्यातून धनंजय महाडिक, माजी आमदार अंमल महाडिक, जिल्हाध्यक्ष सत्यजित घाटगे, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सांगली जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, शिराळा तालुक्यातून पापा नाईक, सोलापूर जिल्ह्यातून रणजितसिंह मोहिते-पाटील, सोलापूर शहराध्यक्ष विक्रम देशमुख, त्यांचे काही पदाधिकारी अशा चारही जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची येथे चर्चा झाली. जिल्ह्यातून नोंदणी झालेले मतदान आणि प्रत्यक्षात झालेले मतदान यातील फरक कोणत्या कारणाने आहे, याची विचारणा पक्षातर्फे करण्यात आली आहे. त्यादृष्टीने यापुढची पक्षाची बांधणी असणार आहे, असे संदेशही नेते, कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.