कराडला वारकर्‍यांचे भर पावसात उपोषण


दैनिक स्थैर्य । 18 जून 2025 । सातारा । येथील तहसील कार्यालयासमोर सद्गुरू जयराम स्वामी पालखी सोहळ्याच्यावतीने वारकर्‍यांनी सोमवारपासून भर पावसात उपोषण सुरू केले आहे. सद्गुरू जयराम स्वामी पालखी सोहळा, मच्छिंद्रनाथ पालखी सोहळा, गाडगेनाथ महाराज पालखी सोहळा, शेकोबादादा पालखी सोहळा, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पालखी सोहळा, सेवागिरी महाराज पालखी सोहळा आणि संत सखू पालखी सोहळा यांना मानाच्या पालखी सोहळ्याच्या यादीत समविष्ट करावे, अशी वारकर्‍यांची मागणी आहे.

याबाबत वारकर्‍यांनी सांगितले की, आषाढी वारीमधील मानाच्या दहा पालख्या शासन स्तरावर मान्यताप्राप्त झाल्या आहेत. यापूर्वी त्यांची संख्या सात होती. त्यानंतर करोना काळामध्ये तीन पालख्या वाढवल्या गेल्या. मात्र, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमधील सद्गुरू जयराम स्वामी पालखी सोहळा, मच्छिंद्रनाथ पालखी सोहळा, गाडगेनाथ महाराज पालखी सोहळा, शेकोबादादा पालखो सोहळा, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पालखी सोहळा, सेवागिरी महाराज पालखी सोहळा आणि संत सखू पालखी सोहळा वर्षानुवर्षे चालत असून, 14 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शासन स्वतः कबूल करत आहे की, हे पालखी सोहळे पंढरपुरमध्ये येतात. मात्र, हे पालखी सोहळे मानाच्या यादीमध्ये नसल्यामुळे शासनाच्या कोणत्याही बैठकीसाठी यातील वारकर्‍यांना बोलावले जात नाही.

प्रशासन सहकार्य करत नाही. त्यामुळे या पालखी सोहळ्यांना मानाच्या यादीमध्ये समाविष्ट करावे, अशी आमची मागणी आहे. सद्गुरू जयराम स्वामी पालखी सोहळ्याचे अध्यक्ष विठ्ठल स्वामी महाराज, मच्छिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष तुकाराम मटकरी, खजिनदार तानाजी यादव, मच्छिंद्रनाथ दिंडीचे चालक मल्हारी जवारे महाराज, निरंजन महाराज, पोपट चव्हाण, कृष्णत महाराज कोळेकर, संत सखू महाराज पालखी सोहळ्याचे निवेदक अंकुश जाधव, चंदू महाराज (शेणोली), नाना घाडगे, संतोष घाडगे, हनुमंत महारा आळंदीकर यांनी उपोषण सुरू केले आहे.

यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. पाऊस असल्याने, आतमध्ये बसून आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केल; परंतु वारकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले असून, त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवरातच भजने म्हणत आंदोलन सुरू केले आहे.


Back to top button
Don`t copy text!