स्मार्ट मीटर न बसवल्यास वीज कापण्याची धमकी; कराडात महावितरणच्या कारभारावर संताप

कराड तालुक्यात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ग्राहकांवर दबाव आणला जात असून मीटर न बसवल्यास वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी दिल्याने तीव्र असंतोष आहे.

स्थैर्य,सातारा, दि. १३ सप्टेंबर : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात स्मार्ट मीटर बसवण्यावरून महावितरण आणि वीज ग्राहकांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. महावितरणकडून काही ग्राहकांना नोटीस देऊन स्मार्ट मीटर न बसवल्यास वीज कनेक्शन तोडण्याची अप्रत्यक्ष धमकी दिली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला आहे. या मनमानी कारभारामुळे वीज ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

नागरिकांचा विरोध आणि वाढीव बिलांचा फटका

कराड तालुक्यात यापूर्वीही स्मार्ट मीटरच्या विरोधात दोन मोठे मोर्चे काढण्यात आले होते. तसेच पंचायत समितीसह काही ग्रामसभांमध्ये स्मार्ट मीटर न बसवण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आले आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिलांची रक्कम तिप्पट ते चौपट वाढल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या असून, या वाढीव बिलांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

शासनाचे निर्देश आणि महावितरणची बळजबरी

घरगुती ग्राहकांसाठी स्मार्ट मीटरची सक्ती नाही, असे स्पष्ट निर्देश विधिमंडळ अधिवेशनात देण्यात आले असतानाही महावितरणचे अधिकारी धमकीवजा नोटीस का देत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच काही ठिकाणी घरात कोणी नसताना परस्पर मीटर बदलण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी महावितरण विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

 

Back to top button
Don`t copy text!