कराड जनता बॅंक दिवाळखोरीत; रिझर्व्ह बॅंकेकडून परवाना रद्द


 

स्थैर्य, कऱ्हाड, दि.८: सहकार क्षेत्रात नावाजलेली कऱ्हाड जनत सहकारी बॅंकेचा बॅंकींग परवाना रिझर्व्ह बॅंकेने आज रद्द केला. त्याबाबतचे आदेश आज येथे प्राप्त झाल्याने ठेवीदार, सभासदामध्ये खळबळ उडाली. रिझर्व्ह बॅंकेने परवाना रद्द केल्यानंतर सहकार आयुक्तांनी बॅंकेची दिवाळखोरी जाहीर करत बॅंक अवसायनत गेल्याचे जाहीर केले आहे. त्या बॅंकेवर उपनिबंधक मनोहर माळी यांची अवसायानिक म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे. बॅंकेचे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे 29 शाखा व 32 हजार सभासद आहेत. 

उपनिबंधक मनोहर माळी यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, कऱ्हाड जनता सहकारी बॅंकेचा बॅंकींग परवाना रिझर्व्ह बॅंकेने रद्द केला आहे. त्याचे आदेश काल रात्री उशिरा पारीत झाले आहेत. सकाळी ते मिळाले आहेत. त्याबाबत बॅंकेतही त्याची स्थळप्रत लावण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या आदेशानुसार बॅंकेत पाच लाखाआतील ठेवीदारांचे पैसे परत केले जाणार आहेत. त्याला किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. बॅंकेच्या दोन विस्तारीत कक्षासह 29 शाखा आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे त्या संस्था विस्तारलेल्या आहेत. त्या सगळ्याच संस्थाचे कामकाज बंद राहणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने परवाना रद्द केल्यानंतर आता सहकार आयुक्तींनी कऱ्हाड जनता बॅंक अवसायानात गेल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी अवसायानिक म्हणून माझीच नेमणूक केली आहे. 

कऱ्हाड जनता बॅंकेवर नोव्हेंबर 2017 मध्ये रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध आले. त्यानंतर 6 आॅगस्ट 2019 रोजी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक झाली. त्यानंतरच्या कालावधीत संचालक मंडळाच्या अनेक गोष्टी बाहेर आल्या. निर्बंधाच्या कालवधीतच बॅंकेचे सभासद आर. जी. पाटील यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीवर पोलिस तपासाचे आदेश झाले. त्यानुसार शहर पोलिसात जनता बॅकेच्या संचालक मंडळासह काही अधिकाऱ्यांवर तब्बल 310 कोटींच्या अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. तोही गुन्हा पोलिस तपासावर आहे. 2017 ते 2019 या निर्बंधाच्या काळात बॅंकेने केलेले काम नियमबाह्य होती. रिझर्व्ह बॅंकेच्या लक्षात आल्यानंतर बॅंकेचा बॅंकींग परवानाच रद्दचा आदेश बॅंकेने दिला आहे. 

सामान्य सभासदांची बॅंक केवळ चुकीच्या कारभारामुळे दिवाळखोरीकडे निघाली आहे. बॅंकेत अपहार कोणी केला. परवाना रद्द होण्यास कोण जबाबदार आहे. याची चौकशी होत नाही. तोपर्यंत बॅंकेच्या विरोधात लढा चालूच ठेवणार आहे. कोर्टात जे खटले आहेत. तेही तितक्याच ताकदीने लढवून न्याय मिळेपर्यंत लढा कायम ठेवणार आहे.

-आर. जी. पाटील, फिर्यादी व सभासद कऱ्हाड जनता बॅंक


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!