
फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या चोऱ्या आणि ‘पोलीस’ असल्याची बतावणी करून होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराफ व्यावसायिक व ज्येष्ठ नागरिकांची संयुक्त बैठक पार पडली.
स्थैर्य, फलटण, दि. २८ एप्रिल : फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या चोऱ्या आणि ‘आम्ही पोलीस आहोत’ अशी बतावणी करून विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी फलटण शहर पोलिसांच्या वतीने विशेष पावले उचलण्यात आली आहेत. या गुन्ह्यांना प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी काल, सोमवारी (दि. २७ एप्रिल) सायंकाळी ७.०० वाजता फलटण शहर पोलीस ठाण्याच्या मीटिंग हॉलमध्ये शहरातील सराफ (सुवर्णकार) व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिकांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक पार पडली.
‘पोलीस’ असल्याची बतावणी करणाऱ्या भामट्यांपासून सावध राहा:
सध्या अनेक शहरांमध्ये तोतया पोलिसांकडून (Fake Police) रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा महिलांना थांबवून, ‘पुढे खून झाला आहे’, ‘पुढे तपासणी सुरू आहे’ किंवा ‘पुढे मोठी चोरी झाली आहे’, अशी भीती दाखवली जाते. त्यानंतर सुरक्षेचे कारण सांगून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून पिशवीत किंवा कागदात गुंडाळून ठेवण्याच्या बहाण्याने हातचालाखी करून ते दागिने लंपास करण्याच्या घटना घडतात. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. खरा पोलीस कधीही रस्त्यावर थांबवून अंगावरील दागिने काढायला सांगत नाही, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अशा अनोळखी भामट्यांपासून अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
सराफ व्यावसायिकांना सुरक्षेच्या महत्त्वाच्या सूचना:
या बैठकीत सराफी व्यापारी आणि दुकानदारांनाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. दुकानात आणि दुकानाबाहेर रस्त्यावरील हालचाली टिपणारे उच्च दर्जाचे सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवणे, दुकानात येणाऱ्या अनोळखी व संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवणे, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देणे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सदर विशेष बैठकीचे आयोजन फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या बैठकीला शहरातील सराफ व्यावसायिक, दुकानदार आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
उपस्थितांनी पोलिसांच्या या सतर्कतेच्या उपक्रमाचे स्वागत करून शहर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
