बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०९ मे २०२३ । गुहागर । बौद्धजन सहकारी संघ, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी गाव-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६७ वा अणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा संयुक्त जयंती महोत्सव संघाचे कार्याध्यक्ष मा. विश्वनाथ कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, जानावळे ता. गुहागर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी मुंबई व गाव शाखांचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, सकाळी धम्माचा पंचशील व निळा ध्वज या ध्वजांचे ध्वजारोहण करून तालुका अध्यक्ष गाव शाखा सुनील जाधव साहेब व मुंबई शाखा अध्यक्ष राजेंद्र जाधव साहेब यांच्या मंगलहस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी समता सैनिक दल चिपळूण आणि गुहागर शाखाच्या वतीने महाराष्ट्र प्रशिक्षक संतोष मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आदर्शांस मानवंदना देण्यात आली. तद्नंतर संविधानाचे प्रास्ताविक सामूहिक वाचन करण्यात आलं, त्यानंतर संघाच्या संस्कार कमिटीचे अध्यक्ष शशिकांत जाधव, सुभाष जाधव आणि त्यांचे सहकारी यांनी सुमधुर आवाजात धार्मिक विधी पार पाडला. पाहुण्यांचे स्वागत स्वागताध्यक्ष व कार्यक्रमाध्यक्ष विश्वनाथ कदम साहेब आणि दीपक मोहिते साहेब यांच्या मंगलहस्ते करण्यात आला. आम्रपाली महिला मंडळ, गुहागर शाखा यांच्या वतीने स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्रजी मोहिते यांनी केले तर प्रास्ताविक आणि चार सत्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा तालुका अध्यक्ष सुनील जाधव साहेब यांनी सादर केले. तद्नंतर माध्यमिक, उच्चमाध्यमिक, पदवीधर, पदविकाधर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गुहागर तहसीलदार प्रतिमा वराळे मॅडम, समता सैनिक दल प्रशिक्षक संतोष मोहिते, ग्रामपंचायत जानावळे, सरपंच जान्हवी शिरगावकर मॅडम, मराठी शाळा नं. १ जानावळे मुख्याध्यापक कैलास शहादुर्ग सर, विश्वस्त व जेष्ठ साहित्यीक, कवी आदरणीय राजाभाऊ तथा रामदास गमरे, विश्वस्त के.सी.जाधव, विश्वस्त महेंद्र कदम, कार्याध्यक्ष दिपकजी मोहिते यांनी सभागृहात आपले विचार मांडून संघाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती, कुशल संघटन यावर आपले विचार व्यक्त करून, संयुक्त जयंतीसंदर्भात तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार यावर प्रकाशझोत टाकत सर्वांना मार्गदर्शन केले, त्याचबरोबर ग्रामीण भागातील सभासदांना उद्योगधंद्यास, मुला-मुलींना शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी तसेच इतर विधायक कामे करण्यासाठी पतपेढीची निर्मिती करण्यात येत आहे, सदर पतपेढीत बँकिंग क्षेत्रात, सहकारी क्षेत्रात मोठ्या पदावर असणारे अधिकारी संचालक मंडळावर असून पारदर्शक काम होणार आहे तरी सर्वांनी पतपेढीचे सभासद बनावे असे आव्हान करण्यात आले. बाबासाहेबांचे विचार व २२ प्रतिज्ञा आपण सर्वांनी आत्मसात करून सर्वांनी एकजुटीने काम करावं असे ही आव्हान करण्यात आले.
तद्नंतर आदर्शांच्या प्रतिमा व मूर्तीची वाजतगाजत भव्यदिव्य मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथून काढण्यात आली, सदर मिरवणुकीत प्रत्येक विभागातून सायकल, बाईक्स, रथ, ट्रॅक्टर यावरून मोठ्या उत्साहात लोक सहभागी झाली होती; त्यामध्ये विभाग क्र. ३ मधील राजेंद्र मोहिते यांचा रथ सरस ठरला, त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष व तालुका कार्याध्यक्ष विश्वनाथ कदम साहेब यांनी संपूर्ण कार्यक्रम व वक्त्यांचा भाषणांचा व संघाने तीन वर्षात केलेल्या कामाचा आढावा व वचनपूर्ती अहवाल सादर केला, संघांच्या कामात मदत करणाऱ्या सर्वांचे त्यानी आभार मानले, या जयंती महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या मुंबई व गाव शाखेचे सर्व आजी माजी मध्यवर्ती कमिटीचे पदाधिकारी, विश्वस्त, विभाग अधिकारी, महिला मंडळ, कार्यकर्ते या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Back to top button
Don`t copy text!