जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा रद्द

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, जेजुरी, दि.११: अवघ्या
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती अमावस्या
यात्रा रद्द करण्यात आली असून, शनिवार ते सोमवार असे तीन दिवस भाविकांना
जेजुरीत प्रवेश दिला जाणार नाही. अशी माहिती जेजुरीचे पोलीस निरीक्षक सुनील
महाडीक यांनी दिली आहे.

जेजुरी येथील खांदेकरी, मानकरी, ग्रामस्थ
मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोमवती
यात्रा रद्द करण्यात आली असून पालखी सोहळ्यावर बंदी घालण्यात आली आहे.
त्यामुळे भाविकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये तीन दिवस जेजुरीत येणे
टाळावे. येथील व्यावसायिकांनी भाविकांना आपल्याकडे उतरून घेऊ नये. तीन दिवस
खंडोबा गडाकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात येणार आहेत. मंगळवार नंतर
पुन्हा खंडोबा गडावर भाविक जाऊ शकतील असे पोलीस निरीक्षक महाडीक यांनी
स्पष्ट केले.

विश्वस्त संदीप जगताप यांनी पोलीस
प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी विश्वस्त मंडळ करेल, कोरोनाचा
प्रसार टाळण्यासाठी शासनाला आपण सहकार्य करावे, भाविकांनी तीन दिवस जेजुरीत
येणे टाळावे, असे आवाहन केले आहे. तसेच, मंगळवारी खंडोबा गडावर चंपाषष्टी
उत्सव ( देव दीपावली ) सुरू होत आहे. या पाच दिवसाच्या काळात ग्रामस्थांना व
भाविकांना नेहमीप्रमाणे मुखदर्शनाची सोय केलेली आहे. चंपाषष्ठीला सर्व
ग्रामस्थ व मानक-यांच्या पूजा प्रथेप्रमाणे केल्या जातील. दर्शन मंडपामध्ये
पुजारी सेवक अन्नदान मंडळातर्फे पाच दिवस दररोज अन्नदान केले जाणार आहे.
चंपाषष्ठी उत्सवासाठी पाहुण्यांना यावर्षी बोलावू नका असे सांगितले.
यावर्षी भर सोमवती आल्याने किमान अडीच ते तीन लाख भाविक उपस्थित राहिले
असते. यात्रेसाठी प्रामुख्याने मुंबई, नाशिक, नगर व पुण्यातील भाविकांचा
भाविकांची गर्दी होते संभाव्य गर्दीची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने सोमवती
यात्रेवर बंदी घातली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!