
दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । इतिहासाचे विद्रुपीकरण करीत त्याचे चित्रपटरुपातून केलेली मांडणी सध्याच्या काळातील मोठे आव्हान आहे. एक विशिष्ट विचारांने प्रेरित होवून वैचारिक दिशाभूल करण्याच्या अनुषंगाने केले जाणारे हे प्रयत्न अयोग्य असून सुजान नागरिकांनी, प्रेक्षकांनी याविरोधात उभे ठाकण्याची गरज आहे,असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपटासंबंधी सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केले आहे. चित्रपटातील चित्रीकरण इतिहासाला धरून नाही. दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचे चित्रपट बनवण्याचा हेतू जरी शुद्ध असला तरी त्यांनी इतिहासाची केलेली मोडतोड स्वीकारता येणारच नाही. त्यामुळे देशपांडे यांनी महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची माफी मागून चित्रपट मागे घ्यावा, असे आवाहन देखील पाटील यांनी यानिमित्ताने केली आहे.
‘हर हर महादेव‘ चित्रपट बंद पाडून प्रेक्षकांना करण्यात आलेली मारहाणीचे समर्थन करता येणार नाही. चित्रपटाला कायदेशीर आणि कायद्याच्या चौकटीत बसून विरोध केला पाहिजे. पंरतु,राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांची देखील भावना समजून घेणे तेवढेच महत्वाचे आहे.या चित्रपटाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड झाली आहे. आव्हाडांसह छत्रपती संभाजी यांनी देखील यासंबंधी आपली भूमिका मांडली आहे.
चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे महाराजांचे एकेरी नाव घेत त्यांच्याशी युद्ध करीत असल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे. हा एका स्वामीनिष्ठ मावळ्याचा अपमान आहे.या सिनेमातून बाजीप्रभूंचे उदात्तीकरण करण्यात आले आहे.अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतांना महाराजाचे वेगळ्यापद्धतीने चित्रण करीत छत्रपतींना नृसिंहअवतार वगैरे आहेत असे दिग्दर्शकाला सुचवायचे असल्याचा देखील आरोप केला जातोय. चित्रपटातील या सर्व प्रसंगावरून इतिहासाचे मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण करण्यात आल्याचे अधोरेखित होत असल्याचे पाटील म्हणाले.