दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२३ | सातारा |
प्रगत शिक्षण संस्थेने संपूर्ण सातारा जिल्ह्यात शैक्षणिक अखंडतेसाठी ‘पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षणातील सेतू’ प्रकल्प राबवावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले.
प्रगत शिक्षण संस्था फलटण, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यक्रम जिल्हा परिषद सातारा व एच. टी. पारेख फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या शैक्षणिक अखंडतेसाठी ‘पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षणातील सेतू’ या प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात केंद्र सरकारच्या निपुण भारत अंतर्गत झालेल्या दोन वर्षाच्या कामाचे जिल्हास्तरावर सादरीकरण करण्याच्या हेतूने आयोजित बालशिक्षण परिषदेत ते बोलत होते.
खिलारी म्हणाले की, हा प्रकल्प अतिशय चांगला असून या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्यात झालेला बदल सहज पाहायला मिळतो आहे. ३ ते ६ वयोगटाच्या मुलांसाठी भाव-भावना, विचार अभिव्यक्त करण्यासाठी या प्रकल्पाची जोड मिळाली आहे. प्रकल्पामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली. मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला आहे. आजची शिक्षण परिषद ही चांगली प्रशिक्षण कार्यशाळा आहे, असे मला वाटते. म्हणून प्रगत शिक्षण संस्थेने हा प्रकल्प संपूर्ण जिल्हाभर राबवावा.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे म्हणाल्या, या प्रकल्पाचा विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर चांगला परिणाम झाला आहे. माणमधील मुलांनी केलेले काम, अंगणवाडीचे वेगळेपण दिसून येत आहे. मी संस्थेच्या सर्वांचे अभिनंदन व आभार मानते. केंद्र शासनाच्या निपुण भारत अंतर्गत निर्धारित केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हा प्रकल्प उपयुक्त आहे.
एच. टी. पारेख फाउंडेशनचे शिक्षण सल्लागार उज्ज्वल बॅनर्जी म्हणाले, प्रगत शिक्षण संस्थेच्या वतीने पूर्वप्राथमिक शिक्षणात झालेले माण तालुक्यातील काम समाधानकारक आहे.विद्यार्थ्यांना याचा फायदाच झाला आहे. प्रशासकीय पातळीवरील सहकार्य असल्याने हे शक्य झाले आहे. मुले स्वतः पुढाकार घेत असून बाल शिक्षणाचे धडे घेत पुढे जात आहेत. त्यांच्यात आत्मविश्वास वाढला आहे. सेविका व मदतनीस यांच्यातील बदल उद्यासाठी प्रेरणादायी आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो.
या परिषदेचे प्रास्ताविक डॉ. मंजिरी निंबकर यांनी केले. त्यांनी प्रगत शिक्षण संस्थेच्या आतापर्यंतच्या कामाचा लेखाजोखा मांडत या प्रकल्पाची पार्श्वभूमी सांगून झालेल्या कामाविषयी माहिती दिली. संस्था ही कायम सरकारी शाळा आणि अंगणवाड्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कटिबद्ध आहे. या प्रकल्पांतर्गत माण तालुक्यातील अंगणवाड्यांसोबत झालेले काम जिल्हा स्तरावर सर्वांना पाहता व सेविका, मदतनीस यांचे विचार, अनुभव ऐकता यावे, या हेतूने ही बाल शिक्षण परिषद आयोजित केली असल्याचे त्यांनी सांगितले.
बालशिक्षण म्हणजे काय? ते कसं करायचे व का करायचे, याबद्दल बोलताना डॉ. नीलिमा गोखले म्हणाल्या, मुलांचा भाषा विकास, त्यांना खेळातून शिक्षण, त्यांची भावनिक सुरक्षितता, प्रत्येक मूल हे स्वतंत्र व्यक्तिमत्व, हा विचार डोळ्यांसमोर ठेवून बालशिक्षणाकडे आपण पाहिले पाहिजे. या प्रक्रियेमध्ये नकारात्मक सूचना नको. निरीक्षण करून, त्याला काय हवे ते ओळखून, काय येते ते पहायला पाहिजे, काय आवडते ते पहा व मग ठरवा काय द्यायचे.शिकायचे स्वातंत्र्य द्या. मुलांना आपण शिकवायचे नाही तर संधी द्यायच्या. त्याला महत्त्व द्या, ताण नको, घरच्या भाषेत संवाद साधा, शिकण्यास प्रेरणा द्या, अशी त्यांनी मांडणी केली.
बाल शिक्षण परिषदेच्या पहिल्या सत्रात अंगणवाड्यांची क्षमता बांधणी आणि त्यांचे परिणाम, या विषयावर परिसंवाद झाला. यात डॉ. मंजिरी निंबकर यांनी सत्र संयोजन केले. मुलाखत व प्रश्नोत्तरे याद्वारे हे सत्र झाले. यामध्ये चांगुणा सरगर, वनिता खंदारे, वंदना दडस या सेविकांनी व निर्मला वाघ या मदतनीस यांनी आपले विचार व्यक्त केले.
आपले विचार व्यक्त करताना त्यांनी, अंगणवाडीत चांगले उपक्रम घेतल्यामुळे व शैक्षणिक साहित्य दिल्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत. मुले बोलकी व शिकणारी आहेत. त्यांना चांगली वाचन सवय आहे.
सेविकाताई बोलताना म्हणाल्या, पुढच्या आठवड्याची तयारी शनिवारी करून रविवारी मुलांसाठी वर्कशीट तयार करतो. आमचे वेळेचे उत्तम नियोजन झाले असून आमची बाल शिक्षणाची समज या प्रकल्पामुळे वाढली आहे.
बालशिक्षण परिषदेच्या दुसर्या सत्रामध्ये प्रकल्पातील परिणामकारक घटक यावर अंगणवाडी सेविका यांनी मांडणी केली. या सत्राचे संयोजन प्रकल्प समन्वयक प्रकाश अनभुले यांनी केले. या सत्रात संगीता चव्हाण, पिंकू भोंडवे, प्रीती सावंत, वंदना गोसावी या सेविकांनी आपली मते व्यक्त केली.
प्रकल्पातील परिणामकारक घटक, या विषयावर अंगणवाडी ताईंना त्यांनी बोलते केले. प्रशिक्षण, साहित्य, प्रकल्प अधिकारी भेटी या घटकांचे फायदे काय झाले? उपयोग कसा केला गेला? याविषयी सेविकांनी आपले मते मांडत प्रकल्पातून कशाप्रकारे फायदा झाला, याविषयी आपली मते मांडली.
तिसर्या सत्रात या प्रकल्पात नसणार्या अंगणवाडी सेविका यांच्याशी प्रकल्पातून झालेल्या फायद्याविषयी व मिळालेल्या प्रेरणेविषयी बोलताना आपली मते मांडली. या सत्राचे संयोजन प्रकल्प अधिकारी राहुल मुळीक यांनी केले. यात नीलम जगदाळे व दीप्ती सावंत या सेविकांनी आपली मते व्यक्त केली. त्यांनी प्रकल्पाबाहेरील अंगणवाड्यांचे काम, या विषयावर ताईंना बोलते केले. प्रकल्पात नसताना त्यांनी इतरांकडून प्रेरणा घेऊन काम सुरू केले. प्रकल्पातील सेविकांना भेटणे, मदत घेणे, प्रकल्प अधिकार्यांची मदत घेणे, असे करून बालशिक्षणास हातभार लावला. त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. आज आम्ही आत्मविश्वासानं सर्व उपक्रम घेत आहोत. त्याचे परिणाम आमच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी झाल्याचे आम्हाला दिसून येत आहे.
बालशिक्षण परिषदेच्या शेवटच्या सत्रामध्ये बालशिक्षण पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षणातील सेतू, या विषयावर मांडणी करण्यात आली. या सत्राचे संयोजन प्रियदर्शनी सावंत यांनी केले. या सत्रात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सहशिक्षिका आशा यादव व पालक प्रतिनिधी म्हणून उषा भानुदास शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले.
बालशिक्षण हे पूर्वप्राथमिक व प्राथमिक शिक्षण यातील सेतू, या विषयावर जि. प. शाळा शिक्षिका आशा यादव व एक पालक यांची मते जाणून घेतली. प्रकल्पाची इ. १ ली साठी भरपूर मदत झाली, फायदा झाला. शिकण्याची गती वाढली आहे. त्याच्या पुढचे शिक्षण त्यांना देण्यास वाव मिळाला. हा प्रकल्प एफएलएन साठी पूरक प्रकल्प आहे. विद्याप्रवेश पूर्ण करण्यास पूरक आहे.
बाल शिक्षण परिषदेसाठी प्रगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झिया कुरेशी, कमला निंबकर बालभवन शाळेचे मुख्याध्यापक विश्वास जगदाळे, प्रियदर्शनी सावंत, बालवाडी मुख्याध्यापिका समीरा कुरेशी, संस्थेच्या विश्वस्त सचिव मधुरा राजवंशी, प्रकल्प समन्वयक प्रकाश अनभुले, सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका मदतनीस, पर्यवेक्षिका, शिक्षक, केंद्रप्रमुख स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रकल्प अधिकारी सोमनाथ घोरपडे यांनी बाल शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले.