शून्यातून विश्व उभारणारे आदर्श व्यक्तिमत्त्व: आयुष्यमान श्री. विठ्ठल निकाळजे यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास!

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

घरची अत्यंत गरिबी, लहान वयात हरपलेले वडिलांचे छत्र आणि असंख्य अडचणींवर मात करत शून्यातून विश्व उभारणारे आणि ३१ वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे श्री. विठ्ठल निकाळजे (सर) येत्या ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासावर टाकलेला हा विशेष प्रकाश…

स्थैर्य, फलटण : जिद्द, कष्ट आणि निष्ठेच्या बळावर स्वतःचे आयुष्य घडवणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात आपला अमिट ठसा उमटवणाऱ्या आयुष्यमान श्री. विठ्ठल बाबुराव निकाळजे यांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. एका अत्यंत साध्या आणि गरीब कुटुंबातून आलेल्या या व्यक्तिमत्त्वाने आपल्या अथक परिश्रमातून केवळ स्वतःचेच नव्हे, तर असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे महान कार्य केले आहे.

लहानपणीच हरपले वडिलांचे छत्र आणि संघर्षाची सुरुवात:

त्यांचा जन्म ५ मे १९६८ रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोनगाव येथे झाला. घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल. वडील शेतकरी आणि आई गृहिणी, दोघेही अशिक्षित. तीन भाऊ व तीन बहिणी अशा मोठ्या कुटुंबाचा गाडा हाकताना अनेक अडचणी येत होत्या. १९७६ साली नांगराच्या फाळामुळे झालेल्या धनुर्वाताने त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले. विठ्ठल सर तेव्हा जेमतेम इयत्ता चौथीत होते. लहान वयातच कुटुंबाचा आधार हरपल्याने परिस्थिती अत्यंत दयनीय झाली. दोन वेळचे अन्नही मिळणे कठीण झाले. कुंजीर, माठ, कुरडू अशा साध्या रानभाज्यांवर दिवस काढावे लागले.

गरिबीचे चटके आणि अपमान:

गरीबी माणसाला खूप काही शिकवते. इयत्ता पहिलीमध्ये असताना अन्नाच्या शोधात शेजारच्या शेतातील मक्याची कणसे मोडली म्हणून चावडीवर काढलेली वरात आणि आईला मागावी लागलेली माफी, हा प्रसंग त्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला. पण याच गरिबीच्या चटक्यांनी त्यांना पुढे जाण्याची जिद्द दिली. इयत्ता दहावीची ४२ रुपये बोर्डाची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी गावातील रामभाऊ बेलदार यांनी मदत केली आणि आईने शेतात राबून ते पैसे फेडले.

शिक्षणाचा ध्यास आणि यशस्वी वाटचाल:

कधी भावाचा शर्ट-पँट घालून, पायात साधी स्लिपर घालून, तर कधी दूध वितरण व मेडिकलमध्ये काम करून स्वतःचा खर्च भागवत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. इयत्ता दहावीचे शिक्षण राजाळे येथून, तर पुढील पदवीपर्यंतचे शिक्षण बारामतीतून पूर्ण करून १९९१ साली त्यांनी बी.एड. पदवी संपादन केली आणि शिक्षक होण्याचे आपले स्वप्न साकार केले.

३१ वर्षांची प्रदीर्घ आणि नि:कलंक सेवा:

त्यांनी १९९२ मध्ये बीबी (ता. फलटण) येथून आपल्या शिक्षक कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर पिंपरी-वाघेरी, बेल्हे, मोखाडा (आदिवासी भाग), नागाव, भोळी, सुरवडी, धुळदेव अशा विविध ठिकाणी ३१ वर्षे ज्ञानदानाचे काम केले. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना पर्यवेक्षक म्हणून बढती मिळाली. सध्या ते श्री ज्योतिर्लिंग इंग्लिश हायस्कूल, चव्हाणवाडी येथे कार्यरत असून, ३१ मे २०२६ रोजी ते सन्मानाने सेवानिवृत्त होत आहेत. विशेष म्हणजे, ३१ वर्षांच्या प्रदीर्घ नोकरीत ते कधीही शाळेत उशिरा पोहोचले नाहीत, हा त्यांचा ‘वेळेच्या शिस्तीचा’ मोठा आदर्श आहे.

अंधश्रद्धेला फाटा आणि धम्म चळवळीत सक्रिय सहभाग:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शिक्षक होण्याचा ध्यास घेतला होता. कुटुंबातील कटू अनुभवांनंतर त्यांनी अंधश्रद्धेला फाटा देत विवेक, विज्ञाननिष्ठा आणि परिवर्तनवादी विचार स्वीकारले. २०१० साली ते श्रामणेर झाले आणि धम्म चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. आजही ते तन, मन आणि धनाने या चळवळीत कार्यरत आहेत.

पत्नीची खंबीर साथ आणि उज्ज्वल भविष्य:

सन २००२ मध्ये एका आजारामुळे त्यांची ९०% दृष्टी कमी झाली होती. मात्र, डॉक्टरांचे सकारात्मक शब्द आणि पत्नी साळूताई भोसले यांची मिळालेली खंबीर साथ यातून ते सावरले. आज त्यांची दोन्ही मुले, अजय आणि विजय, उच्चशिक्षित असून वडिलांचा आदर्श अभिमानाने पुढे नेत आहेत.

अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर:

त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले प्राजक्ता शिरसाट, विनय काशीकर, प्रज्ञा शेजवळ, अमोल मोहटकर, अमेय मांडवकर, मेघा लेमन यांसारखे असंख्य विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, अधिकारी आणि उद्योजक म्हणून समाजात ताठ मानेने वावरत आहेत.

सेवानिवृत्तीनंतर आधुनिक शेती, उद्योग उभारणी आणि सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय राहण्याचे त्यांचे नवे ध्येय आहे. संघर्ष, जिद्द आणि समाजासाठी झटणारी वृत्ती यांच्या बळावर यशस्वी ठरलेला श्री. विठ्ठल निकाळजे सरांचा हा प्रवास प्रत्येकासाठी निश्चितच एक दीपस्तंभ ठरेल. त्यांच्या पुढील निरामय व आनंदी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

(माहिती स्रोत आणि शुभेच्छुक : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण, तालुका माजी कार्यकारिणी व संपूर्ण BBM Family)

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!