दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२३ । सातारा । जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्हा कारागृहातील बंदी जणांना उद्योजकता विकास प्रशिक्षण देण्याचे शिबीर संपन्न झाले. या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या बंदीजणांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, जिल्हा उद्योग केंद्राचे उमेशचंद्र दंडगव्हाळ आदी उपस्थित होते.
शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नविन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरूप वाव देणारी सर्वसमावेशक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम सातारा जिलह्यामध्ये राबविण्यात येत असतो.
जिल्हा कारागृहातील बंदीजणांना अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सदाशिव सुरवसे उद्योग सह संचालक पुणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे श्री. दंडगव्हाळ, जिल्हा कारागृह अधीक्षक श्री. शेडगे व वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री. दुबे यांच्या सहकार्य लाभले. दि. 28 डिसेंबर 2022 ते दि. 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत कॉम्प्यूटर अर्कोॉटींग वुईथ ऑफीस असिस्टंट प्रशिक्षण व दि. 2 जोनवारी 2023 ते दि. 2 फेब्रुवारी 2023 या कालावधीत मोटार रिवाईडींग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमास बंदीजणांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम शितल पाटील, प्रगती महिला कल्याणकारी शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्ष अलका पाटील यांनी दोन्ही कार्यक्रमाचे नियोजन व प्रशिक्षण चांगल्या रितीने पार पाडले. तसेच दोन्ही प्रशिक्षण कालावधीमध्ये साधारण तीन महिने कारागृहाची सुरक्षा सांभाळून अधिकारी व कर्मचारी यांनी सदर प्रशिक्षणासाठी मोलाचे सहकार्य केले.