दैनिक स्थैर्य | दि. २८ फेब्रुवारी २०२४ | पुणे |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ ते २०२४ या कालावधीत भारताची पुनर्बांधणी केली आहे. २०२४ पासून भारताचा विकसित देश बनण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला असून विकासाच्या दृष्टीने पुढचे दशक हे भारताचेच राहणार आहे, असा विश्वास केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच जलशक्ती राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केला.
‘विकसित भारत संकल्प यात्रे’अंतर्गत ‘आय एम विकसित भारत एम्बेसिडर’ कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी पुण्यातील तरुण उद्योजक, स्टार्टअप्स, विद्यार्थी तसेच नागरिकांशी संवाद साधला.
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ या विषयावर सादरीकरण आणि विश्लेषण करताना केंद्रीय मंत्री चंद्रशेखर म्हणाले की, विकसित भारत हे काही फक्त आकर्षक अथवा लक्षवेधी वक्तव्य नसून तो आपल्या सर्वांचा उद्देश आहे. हे आपण स्वतःला दिलेले एक लक्ष्य आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ या संकल्पनेला पुढे नेण्यासाठी देशातील प्रत्येक घटकाचे त्यामध्ये योगदान आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले, २०१४ पूर्वीच्या भारतात भ्रष्टाचार, तुष्टीकरण, घराणेशाही, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यांच्यामुळे देशाच्या विकासात अनेक अडथळे आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानंतर देशातील व्यवस्थेमध्ये चैतन्य निर्माण झाले असून गेल्या १० वर्षात भारताने नाजूक ५ अर्थव्यवस्था ते सर्वोच्च ५ अर्थव्यवस्था असा प्रवास केला आहे. ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारत करत असलेल्या उल्लेखनीय वाटचालीमुळे देशातील तरुणांसाठी अनेक जागतिक संधी उपलब्ध होत आहेत. ’विकास भी विरासत भी’ या संकल्पनेनुसार आपली ओळख, आणि अभिमान जपून विकास साधला जात आहे.
आधुनिक भारताच्या इतिहासात प्रथमच भारत देश हा अतिशय महत्त्वाच्या आणि रंजक अशा टप्प्यावर उभा आहे. विकसित राष्ट्र बनत असताना पुढील दशकात आपली वाटचाल कशी असेल, यावर आपले भवितव्य अवलंबून आहे, असे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले.