
मुधोजी महाविद्यालयात भारतीय ज्ञान परंपरेवर एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. प्रा. अनिकेत चव्हाण यांनी पीपीटीद्वारे मार्गदर्शन केले.
स्थैर्य, फलटण, दि. ०६ सप्टेंबर : मुधोजी महाविद्यालय फलटण येथे प्राचार्य शिवाजीराव भोसले प्राध्यापक प्रबोधिनी आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. फलटण एज्युकेशन सोसायटीचा अमृत महोत्सव आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित या कार्यशाळेत नसरापूर येथील नव सह्याद्री अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. अनिकेत चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
भारतीय ज्ञान परंपरेचे वेगळेपण
मार्गदर्शन करताना प्रा. अनिकेत चव्हाण म्हणाले की, प्राचीन काळी भारतीय ज्ञान परंपरा अत्यंत प्रगल्भ होती. भाषा, साहित्य, कला, राजकारण, संगीत आणि विज्ञान या संस्कृतीच्या विविध पैलूंचा पाया भारतीय तत्त्वज्ञानात होता. भारतात आस्तिक आणि नास्तिक अशा नऊ प्रमुख विचार परंपरा एकमेकांशी वाद-प्रतिवाद करत विकसित झाल्या. या सर्वसमावेशक वैचारिक देवाणघेवाणीतूनच भारतात खऱ्या अर्थाने सहिष्णुता रुजली आहे.
विज्ञानाची साथ आणि माणूस घडवणारे शिक्षण
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी ज्ञान परंपरा समजून घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. आपल्या प्रगल्भ ज्ञान परंपरेने मानवतावादी विचार दिला असून आता काळानुरूप विज्ञान-तंत्रज्ञानाची साथ घेऊन पुढे गेले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमात प्राचार्यांच्या हस्ते शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.