भारत देशाला आज धर्मनिरपेक्षततेची नितांत आवश्यकता – प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑगस्ट २०२४ | फलटण |
भारताची राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकत्व लाभलेल्या लोकशाहीतील प्रत्येक घटकाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायहक्कासाठी आज भारताला धर्मनिरपेक्षता या राष्ट्रीय एकात्मतेच्या उद्दिष्टाची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी व कायद्याचे अभ्यासक अ‍ॅडव्होकेट डॉ. ए. के.शिंदे होते, तर प्रमुख उपस्थितीत प्रा. सोमनाथ लवांडे, डॉ. अभिजीत धुलगुडे, प्रा. अक्षय अहिवळे, प्रा. किरण सोनवलकर, प्रा. ललित वेळेकर व प्रा. रेश्मा निकम होते.

मुधोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय सद्भावना दिवस’ कार्यक्रमात प्रोफेसर पवार ‘भारताची राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर प्रमुख साधनव्यक्ती म्हणून बोलताना पुढे म्हणाले की, भारतातील सामान्य नागरिकत्व, विविधतेतील एकता, धर्मनिरपेक्षतता, स्वातंत्र्य, समता, बंधुता, समानता तसेच सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय या राष्ट्रीय एकात्मततेच्या उद्दिष्टांबरोबरच राष्ट्रीय एकात्मता वृद्धिगंत करणार्‍या धर्मनिरपेक्षता, लोकशाही, राष्ट्रीय सण, राष्ट्रीय चिन्हे आणि परस्परावलंबन या मूलभूत घटकांची प्रत्येक भारतीयाने पाठराखण करून त्यांची बूज राखली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित भारतीय संविधानाने चिन्ह, विचार, छिन्नविच्छिन्न समाजरचना, जातीवाद व वर्णव्यवस्थेत असलेल्या भारताला संविधानाच्या रूपात एका मानवतेच्या रेशमी धाग्याने विणलेले आहे. आज जातीवाद, सांप्रदायिकता, भाषिक अतिरेक, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, राजकीय विषमता, गुन्हेगारी कारवाया, प्रादेशिक भेद इत्यादी समाजविघातक व बाधक घटकांनी डोके वर काढलेले दिसते. हे देशातील मणिपूर व तत्सम ठिकाणी घडलेल्या घटनांवरून लक्षात येते. विविधतेतून एकता साधलेल्या भारतीय समाजाला प्रेम, शांती, अहिंसा. सद्भावना, प्रज्ञा, शील, करुणा या मानव मूलभूत मूल्यांनी अधोरेखित केले पाहिजे. म्हणून भारताच्या ऐक्य व मजबुतीसाठी देशाला धर्मनिरपेक्षता व मानवता याची नितांत गरज असल्याचे प्रोफेसर डॉ. प्रभाकर यांनी आवर्जून सांगितले.

अध्यक्षपदावरून बोलताना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी व कायदे अभ्यासक अ‍ॅडव्होकेट डॉ. ए. के. शिंदे म्हणाले की, भारत हा अनेकतेतून एकता साधणारा देश आहे. संविधानाने राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी काही मूलभूत कलमांद्वारे दिशा दिग्दर्शन नेमून दिलेले आहे. राज्या-राज्यात, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची चांगली ओळख निर्माण होण्यासाठी सलोखा, सद्भावना व राष्ट्रीय एकात्मतेची नितांत गरज आहे. आपल्याकडे ‘सद्भावना दिवस’ माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून साजरा केला जातो. भावी पिढ्यांनी राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी कोणा एका जात व धर्माचे अवडंबर न वाजवता ‘मी भारतीय आहे’ ही व्यापकत्वाची भावना जपणे गरजेचे आहे.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. अभिजीत धुलगुडे यांनी केले. प्रमुख साधन व्यक्तीचा परिचय अ‍ॅडव्होकेट डॉ. ए. के. शिंदे यांनी करून देऊन, महाविद्यालयाचे ‘उदय’ नियतकालिक देऊन स्वागत केले.

कार्यक्रमास प्रा. किरण सोनवलकर, प्रा. ललित वेळेकर व प्रा. रेश्मा निकम यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या बहुसंख्य स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होत्या. यावेळी सर्वांनी ‘राष्ट्रीय सद्भावना प्रतिज्ञा’ उद्घोषित केली. प्रा. सोमनाथ लवांडे सर यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!