केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२३ । केज । न्यायालय हे पक्षकारांसाठी आहे, ते आहेत म्हणून आम्ही आहोत. न्यायालयाच्या पायरीचे दर्शन घेऊन  न्याय मंदिरात प्रवेश घेणारे पक्षकार मी पाहिले आहेत. न्यायदान याचा अर्थ न्याय्य निर्णय  (judicious judgement) असा आहे. कारण एकास दान करताना समोर प्रतिवादीदेखील आहेत, हे विसरून चालणार नाही. म्हणून पक्षकारांसाठीचा न्याय्य निर्णय (ज्युडीसीएस जजमेंट)  हाच  न्यायदान आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  रविंद्र घुगे यांनी केले.

केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन आज न्यायमूर्ती श्री. घुगे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  राजेंद्र गोविंद अवचट, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती  रविंद्र मधुसूदन जोशी, राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती संभाजी शिवाजी शिंदे , बीड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद लक्ष्मीचंद यावलकर , केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश कुणाल धनाजी जाधव व केज वकिल संघाचे अध्यक्ष विधिज्ञ महादेव संपतराव लाड, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे सदस्य विधिज्ञ व्हि.डी. साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.जोशी यांनी सांगितले, नवीन न्यायालयातील काम व जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे कामाचा वेग देखील वाढवायला लागेल. वकील संघाच्या न्याय्य मागण्याची नक्कीच दखल घेऊन विचार केला जाईल. पक्षकारांच्या सोयीच्या दृष्टीने न्यायालयाच्या परिसरात जास्तीत जास्त झाडे लावली जावेत असे देखील त्यांनी सांगितले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. यावलकर यांनी केज येथील नवीन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू होत असून येथे धारूर व केज तालुक्यातील अंबाजोगाई व माजलगाव न्यायालयात असलेले जवळपास 2 हजार दिवाणी व फौजदारी प्रकरणे स्थानांतरित करण्यात आली आहेत. त्यावरील न्यायदान प्रक्रिया सुरू होईल. या  प्रकरणांमध्ये अंबाजोगाई न्यायालयातील 458  व माजलगाव न्यायालयातील 273 फौजदारी प्रकरण केज येथे स्थानांतरित करण्यात आले आहेत, असे सांगितले.

राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती श्री. शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

केज वकील संघाचे अध्यक्ष विधिज्ञ श्री. लाड यांनी केज न्यायालयाची सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत झालेल्या वाटचाली बद्दल माहिती दिली. विधिज्ञ व्ही. डी .साळुंखे यांनी महाराष्ट्र बार कौन्सिलच्या कार्याबद्दल व वकिलांच्या मागण्यांबद्दल माहिती दिली.

याप्रसंगी बार कौन्सिलच्या वतीने राज्यातील सर्व तालुका व जिल्हा न्यायालयातील वकील संघांना ई फायलिंग सुविधा होण्यासाठी संगणक यंत्रणा दिल्या जाणार असून केज वकील संघास सदर यंत्रणा न्यायमूर्ती श्री. घुगे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनाजी जाधव यांनी केले.

व्यासपीठावर आगमन होताच सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, केज येथील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने स्वागत केले. याप्रसंगी न्यायमूर्ती श्री.घुगे , न्यायमूर्ती श्री.अवचट, न्यायमूर्ती श्री.जोशी यांच्यासह व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे केज वकील संघ आणि जिल्ह्यातील वडवणी, माजलगाव, बीड, गेवराई, शिरूर,अंबाजोगाई यासह जिल्ह्यातील  विविध  वकील संघ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका वकील संघ यांचेकडून पुष्पगुच्छ,शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास नंदकिशोर मुंदडा , रमेश आडसकर, बजरंग सोनवणे , राजेश देशमुख यासह  विविध  शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केज न्यायालयाच्या आवारात आगमन होताच न्यायमूर्ती श्री.घुगे यांच्या हस्ते जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या कोनशिलेचे अनावरण झाले. नंतर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायदान कक्षाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले . याप्रसंगी उपस्थित सर्व मान्य वरांनी इमारतीतील पुरुष वकील कक्ष , महिला वकील कक्ष, विविध न्यायदान कक्षांची व प्रशासकीय दालनांची पाहणी केली. यावेळी मान्यवरांसोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, पोलीस उपअधीक्षक पंकज कुमावत( आयपीएस),  सार्वजनिक बांधकाम व विविध  शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!