वाल्ह्यात वारकऱ्यांना झाले माऊलींचे विश्वरुप दर्शन; आज पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात प्रवेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १८ जून २०२३ | वाल्हे | सूर्यकांत भिसे |

सदा नामघोष करू हरिकथा |
तेणे सदा चित्ता समाधान ॥
सर्व सुख ल्यालों सर्व अलंकार |
आनंदे निर्भर डुलतसे ॥

सदैव नामघोष केल्याने समाधान लाभते. नामामुळे देहाला विदेही अवस्था प्राप्त होते. पाप – पुण्यापलीकडील आनंदाचा अनुभव घेता येतो. राम नाम जपामुळेच वाल्याचा वाल्मिकी झाला. नामाचा हा अगाध महिमा वर्णन करणारे अभंग गात श्री ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्याने सकाळी ११.३० वाजता रामायणकार महर्षि वाल्मिकींच्या वाल्हेनगरीत प्रवेश केला. समाज आरतीच्या वेळी वारकऱ्यांना माऊलींचे विश्‍वरूप दर्शन झाले . समाज आरतीनंतर हा सोहळा येथे विसावला. उद्या दि.१८ रोजी निरास्नानानंतर सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात प्रवेश होईल. पहाटे आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई यांच्या हस्ते श्रींच्या पादुकांना रुद्राभिषेक करण्यात आला . आरती नंतर सोहळा वाल्हेकडे मार्गस्थ झाला .

आज सकाळपासूनच उन्हाची तिरीप जाणवत होती . सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असल्याने सकाळी ७ . ४५ वाजता सोहळा सकाळच्या न्याहरीसाठी दौंडज खिंडीत पोहोचला .

घ्यारे भोकरे भाकरी l
दही भाताची शिदोरी ll

असे म्हणत येथे वारकऱ्यांनी सकाळची न्याहरी उरकली . परिसरातील भाविकांनी वारकऱ्यांसाठी भाकरी , चपाती , बेसन , थालीपीठ , उसळा , दाळकांदा आदी खाद्यपदार्थ न्याहरीसाठी आणले होते . न्याहरी नंतर सोहळा सव्वाआठ वाजता दौंडजकडे मार्गस्थ झाला . श्री खंडेरायाचे दर्शन घेवून कडेपठार मार्गे हजारो भाविक दौंडज खिंडीत दाखल झाले होते . न्याहरीनंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगातून टाळमृदंगाच्या तालावर विठ्ठलनामात दंग होत वारकरी चालत होते . पाऊस न झाल्याने एरव्ही हिरवळीचा गालीचा अंथरल्यासारख्या वाटणाऱ्या या पर्वत रांगा आज उघड्या बोडक्या वाटत होत्या. दौंडज येथे अर्धातास विश्रांती घेवून व भाविकांना दर्शन देवून माऊली वाल्ह्याकडे निघाली .

वाल्ह्यात उत्साही स्वागत

रामायणकार महर्षी वाल्मिकांची कर्मभूमी असलेल्या वाल्हे नगरीत सकाळी ११ . ३० वाजता अश्वांचे व नंतर माउलींचे आगमन झाले . वाल्हेकरांच्या वतीने पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे , सरपंच अमोल खवले , भाजपा ओबीसी सेल उपाध्यक्ष सचिन लंबाते , बाबा कोल्हापुरे , पठाण यांच्यासह ग्रामस्थांनी माउलींचे दर्शन घेवून स्वागत केले . सोहळा दुपारी १ वाजता वाल्हे येथील विस्तीर्ण अशा पालखी तळावर पोहोचला . माऊलींच्या सोहळ्यात वाल्हे येथे दुपारची समाज आरती होते . या समाज आरतीसाठी लाखो भाविकांनी पालखी तळावर गर्दी केली होती . मधोमध माउलींचा तंबू , चौफेर टाळ , मृदुंग , भागवत धर्माची पताका घेवून उभा राहिलेले वारकरी व मध्यभागी आरतीसाठी जमलेला जनसमुदाय असे समाज आरतीचे विस्तीर्ण रुप पाहून वारकऱ्यांना येथे माउलींचे विश्वरुप दर्शन येथे झाले . आरतीनंतर सोहळा विसावला .

आज सातारा जिल्हा प्रवेश

श्री ज्ञानराज माउलींचा पालखी सोहळा उद्या रविवार दि . १८ रोजी सकाळी नीराकडे मार्गस्थ होइल . दुपारचा नैवेद्य व भोजनानंतर हा सोहळा नीरास्नानासाठी नीरा नदीवरील दत्तघाटावर पोहोचेल व नीरा स्नानानंतर तो पुणे जिल्ह्याचा निरोप घेवून हा सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल .

विरोधी पक्षाने वारीच राजकारण करु नये : विनोद तावडे

वारकरी हा सहिष्णू आहे . वारकरी सांप्रदाय हा विश्वव्यापक व विश्वाचे कल्याण चिंतणारा आहे . आम्हाला राजकारणासाठी अकरा महिने पडलेले आहेत . परंतु आषाढी वारीचा हा एक महिना संपूर्ण विश्वासाठी शांती , समता व बंधूताची शिकवण देणारा महिना म्हणून याकडे पाहिले जाते . त्यामुळे किमान या महिन्यात तरी विरोधी पक्षाने राजकारण न करता संतांची शिकवण अंगीकारून विश्वाला शांती , समता व बंधूताचा संदेश द्यावा असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले .

तावडे व त्यांच्या पत्नी वर्षाताई यांनी आपल्या परिवारासमवेत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात जेजुरी ते वाल्हे हा सुमारे १२ किलोमीटरचा टप्पा पार केला . वारकऱ्यांसमवेत दौंडज येथे त्यांनी न्याहरी घेतली तर वाल्हे येथे ते माऊलींच्या समाज आरतीला उपस्थित राहिले .  आळंदीत प्रस्थान सोहळ्याच्या वेळी वारकरी विद्यार्थी व पोलिसात झालेली झटापटी व त्याचे विरोधी पक्षाने केलेले भांडवल याबद्दल तावडे यांनी नाराजी व्यक्त केली . आळंदी संस्थानने याबाबत वस्तुस्थिती मांडली असल्याचे ते म्हणाले . गेली अनेक वर्षे आपण वारीत सहभागी होतो . वारीचा आनंद घेतो . संतांचे संगती चालताना एक वेगळीच उर्जा मिळते असेही ते म्हणाले .

वारीत चालणारी आमची तिसरी पिढी : माजी मंत्री वर्षा गायकवाड

माजी मंत्री, कॉंग्रेसच्या मुंबई शहर अध्यक्ष आमदार वर्षाताई गायकवाड यांनीही जेजुरी ते वाल्हे हे बारा किलोमीटरचे अंतर वारकऱ्यांसमवेत पार केले . वारीत चालणारी ही आमची तिसरी पिढी असल्याचे त्या म्हणाल्या . माझी आजी , वडील हे वारीत चालत होते . आता मी वारीचा एक टप्पा पूर्ण केला आहे . वारीत चालण्याचा आनंदच वेगळा आहे . वारी ही समतेची वारी आहे . येथे जात , धर्म , पंथ विसरुन वारकरी सहभागी होतात असे त्या म्हणाल्या .


Back to top button
Don`t copy text!