जागतिकीकरणात हिंदी भाषा ठरतेय करिअरचा राजमार्ग – प्रा. प्रदीप जटाळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ सप्टेंबर २०२२ । सातारा । भारत देश जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. जागतिकीकरणाच्या युगात अनेक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या भारताकडे ग्राहक म्हणून पाहत आहेत. भारत देशाची संपर्क भाषा, जनभाषा, राजभाषा व राष्ट्रभाषा म्हणून हिंदीचे स्थान व्यापारिक, सामाजिक व राजनीतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे युवकांनी पारंपारिक नोकरीच्या मानसिकतेतून बाहेर पडायला हवे. भाषिक कौशल्ये आत्मसात करून स्वतःची ओळख बनवली तर संधी तुमचे दार ठोठावेल. हिंदी भाषेचे ज्ञान हे अर्थार्जन व सन्मान देणारे क्षेत्र आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी अभ्यास व कष्ट करण्याची गरज आहे. भाषिक कौशल्यासाठी मनातील न्यूनगंड काढावेत. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात हिंदी भाषा ही करिअरचा राजमार्ग ठरत आहे. असे विचार मडगाव (गोवा) येथील पार्वतीबाई चौगुले कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयचे हिंदी विभागप्रमुख प्रा. प्रदीप जटाल यांनी केले. ते छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील हिंदी विभागाच्या वतीने प्रिं. डॉ.विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हिंदी सप्ताहाच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी भाषा और रोजगार के अवसर या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे होते. यावेळी आठवडाभर घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व, काव्यवाचन, चित्रकला, सुलेखन व भित्तिपत्रक – लेखन या स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रा. जटाळ पुढे म्हणाले की ज्ञानभाषा इंग्रजी बद्दल आकस न बाळगता आपण आपल्या राजभाषा व मातृभाषा बद्दल ही तितकेच आग्रही व ज्ञानपिपासू असले पाहिजे. हिंदी भाषेचा सर्वांगीण अभ्यास असेल तर वाणिज्य, व्यापार, अध्यापन, संशोधन, लेखन, भाषांतर, सिनेमा,
जाहिरात, रेडिओ , दूरदर्शन , विमा, रेल्वे, गीतलेखन, समालोचन, निवेदन, डबींग , सोशल मीडिया इत्यादी क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करता येते. आज हिंदी भाषेच्या लेखन व प्रस्तुतीकरण कलेच्या ज्ञानावर डॉक्टर, इंजिनियर व सरकारी अधिकारी यांच्यासारखे वेतन घेणारे अनेक मान्यवर समाजामध्ये दिसतात. मात्र यासाठी विद्यार्थ्यांनी भाषेचे बारकावे व झोकून देऊन कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे यांनी सांगितले की आज ज्ञानभाषा इंग्रजी मधील अनेक संदर्भ – ग्रंथ हे हिंदी मधून उपलब्ध आहेत. आजचे युग भाषिक कौशल्ये असणाऱ्यांचे युग आहे. व्यक्तिमत्व विकासात श्रवण ,कथन, लेखन, वाचन व संवाद कौशल्याचे महत्वपूर्ण स्थान असते.

स्वागत व प्रास्ताविक हिंदी विभागाच्या प्रमुख प्रोफेसर डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय हिंदी सप्ताहचे समन्वयक डॉ. संदीप किर्दत यांनी करून दिला. आभार प्रा. डॉ. सादिक तांबोळी यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ कोळी व प्रा. सुशील हुपरीकर यांनी केले. डॉ. प्रदीप शिंदे व डॉ. युवराज माने यांनी हिंदी सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धकामधील विजेत्या स्पर्धकांच्या नावांची उद्घोषणा केली. यावेळी हिंदी भाषा प्रेमी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!