बेळगावात कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी फलकावर फासले काळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, बेळगाव, दि.२०: बेळगाव जिल्ह्यातील पिरनवाडी
येथे १४ ऑगस्ट रोजी संगोळी रायण्णा यांचा पुतळा उभारण्यावरून भाषिक वाद
सुरू झाला, तो वाद शमला असे वाटत असतानाच आता हा नवा वाद उद्भवला आहे.आमदार
अभय पाटील यांच्या समर्थकांनी अनगोळ नाका येथे फलक लावला होता. त्याच
फलकाला काळे फासण्यात आले आहे. बेळगावातील या भागात तणाव निर्माण झाला आहे.
मात्र पोलिस प्रशासनाने अद्याप कोणताही कारवाई केली नाही.

मराठा
विकास प्राधिकरण स्थापनेबद्दल मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांचे
अभिनंदन करण्यासाठी लावण्यात आलेल्या मराठी भाषेतील फलकाला कन्नड भाषिकांनी
काळे फासले. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. त्या फलकावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री येडीयुराप्पा, बेळगाव दक्षिणचे आमदार
अभय पाटील यांच्यासह काही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे छायाचित्र होते.
मराठा विकास प्राधिकरण स्थापनेसाठी पाठपुरावा केल्याबद्दल त्या फलकाच्या
माध्यमातून आमदार अभय पाटील यांचे आभारही व्यक्त करण्यात आले होते. या
घटनेमुळे अनगोळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण आहे. गळ्यात लाल व पिवळ्या
रंगाचा स्कार्फ घातलेल्या दोन तरुणांनी हे कृत्य केले आहे. त्याचे व्हिडिओ
चित्रण करून ते चित्रण समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आले आहे. आमदार
अभय पाटील यांच्या छायाचित्राला काळे फासण्याची सूचना चित्रण करणारा तरूण
देत होता. अत्यंत वर्दळीच्या अशा या ठिकाणी हा प्रकार घडत असताना त्याला
कोणी आक्षेप घेतला नाही हे विशेष. फलकाला काळे फासून ते तरूण आरामात तेथून
निघून गेले. या घटनेमुळे बेळगाव शहरात पुन्हा भाषिक तणाव निर्माण झाला आहे.
घटनेनंतर तो फलक तातडीने तेथून हटवण्यात आला आहे.

कर्नाटकात
मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. १३ नोव्हेंबर रोजी
प्राधिकरणाची स्थापना झाली तर १४ रोजी त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
त्यानंतर राज्यातील कन्नड संघटनांनी या प्राधिकरण स्थापनेला विरोध केला
आहे. बेळगावात प्राधिकरण स्थापनेला थेट विरोध झालेला नाही. पण प्राधिकरण
स्थापनेनंतर कन्नड संघटनांची धुसफूस सुरू आहे. कन्नड संघटनांच्या दबावानंतर
कर्नाटक सरकारने प्राधिकरणाचा निर्णय मागे घेवून मराठा समाज महामंडळ
स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तरीही कन्नड संघटनांचा विरोध कायम आहे.
प्राधिकरण स्थापनेसाठी पाठपुरावा केल्याचे श्रेय शहराच्या दोन्ही आमदारांना
त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिले. त्याबाबतचे संदेश समाज माध्यमांवर
व्हायरल झाले. शिवाय शहरात विविध ठिकाणी अभिनंदनाचे फलकही लावण्यात आले.
यातुनच फलकावर काळे फासण्याचा प्रकार घडला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!