स्थैर्य,दि.३०: कोरोना महामारीमुळे गतवर्षी जगातील प्रमुख क्रीडा स्पर्धा रद्द कराव्या लागल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या. जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी जाणारी ऑलिम्पिक स्पर्धादेखील यामुळे पुढे ढकलण्यात आली होती. २०२० साली जपानची राजधानी टोक्यो येथे होणारी ऑलिम्पिक स्थगित केली गेली आहे. नव्या वर्षातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने या स्पर्धेच्या आयोजना विषयी शंका उपस्थित केली जातेय. मात्र, स्वतः जपानच्या पंतप्रधानांनी पुढे येत, ऑलिम्पिक होणारच असे म्हटले आहे.
टोक्यो येथे होणार होती ऑलिम्पिक
जगातील क्रीडाप्रेमींसाठी सर्वात मोठी पर्वणी मानल्या जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० यादरम्यान जपानची राजधानी टोक्यो येथे होणार होती. मात्र, कोरोना महामारीने जगभरात थैमान घातल्याने ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेली. त्यानंतर, २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या काळात ही स्पर्धा आयोजित करण्याचे नक्की केले गेले होते.
“ऑलिम्पिक होणारच”
जपानमध्ये कोरोनाची तिसरी लाट आल्याने जुलै महिन्यात होणारी ऑलिम्पिक रद्द होते की काय अशी शंका निर्माण झाली आहे. मात्र, स्वतः जपानच्या पंतप्रधानांनी समोर येत याविषयी आपली प्रतिक्रिया दिली. जागतिक ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर, जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी म्हटले की, “आम्ही खंबीरपणे स्पर्धेची तयारी सुरू ठेवली आहे. स्पर्धेविषयीची आशा आणि धैर्य जगामध्ये पसरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ठरलेल्या काळातच ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केल्या जातील.”
जपानमध्ये वाढतोय कोरोनाचा प्रभाव
जपानमध्ये कोरोनाची नवी लाट आली असतानाही लसींचे प्रभावी वितरण होत नाही. जपानमध्ये जवळपास १३० मिलियन अमेरिकन डॉलरची गुंतवणूक या लसींच्या वितरणासाठी करण्यात आली आहे.