राज्यातील चित्र बदलायचे असेल तर मंत्रिमंडळ विस्तार करा!; अजित पवारांच्या निवासस्थानी बैठक; श्रीमंत रामराजेंची उपस्थिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 06 जुन 2024 | मुंबई | राज्यामध्ये जी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार करणे आवश्यक आहे. अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडली असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. सदरील बैठकीस विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुद्धा उपस्थिती होती.

राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती मधील सर्वच पक्ष आपापल्या पक्षाचा आढावा घेत आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असल्याचे माहिती समोर येत आहे. यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती असल्याची चर्चा सुरू आहे.

सदरील बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ दिलीपराव वळसे पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक प्रमुख मंत्री व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असल्याचे कळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी होऊन एक वर्ष झाले तरी अद्याप नव्याने मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अजूनही राष्ट्रवादीच्या कोट्यातली कॅबिनेट खाते रिक्त आहे. आता शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांचे मंत्रीपद रिक्त झाले आहे. येत्या 15 दिवसांमध्ये शपथविधी आयोजित करुन हे मंत्रीपद भरा. तसेच इतर खात्याच्या राज्यमंत्रीपदांचेही वाटप करा, अशी मागणी अजितदादा गटाकडून करण्यात येणार आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.


Back to top button
Don`t copy text!