‘ड्रोनद्वारे चोरी’ ही अफवाच – पोलीस निरीक्षक सुनील महाडिक


दैनिक स्थैर्य | दि. ६ जून २०२४ | फलटण |
अलीकडे काही दिवसात ‘ड्रोन’ हे फलटण नदीपट्ट्यातील गावांच्या वरती उडताना दिसत आहेत. हे ड्रोन बारामती तालुक्यात अनेक गावांमध्ये दिसून आलेले आहेत. तसेच दौंड सुपा या भागातसुद्धा दिसून आलेले आहेत. मात्र, हे ड्रोन फोटोग्राफीसाठी किंवा सर्वेसाठी वापरले जात आहेत, अशी माहिती आहे. त्यामुळे फलटण तालुक्यात फिरणारे ड्रोन हे चोरीच्या उद्देशाने फिरत आहेत, ही बातमी अफवा असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक महाडिक यांनी सांगितले की, या प्रकाराबाबत आम्ही बारामती तालुक्यातील अधिकार्‍यांच्या संपर्कामध्ये आहोत. बहुतेक हा प्रकार बारामती तालुक्यातील काही गावांमधूनच होत आहे; परंतु लाईटमुळे हे ड्रोन आपल्या भागात सुद्धा दिसून येत आहेत. बारामती तालुक्यात ड्रोन शोधण्यासाठी एक खास पथक तयार करण्यात आलेले आहे. त्यांच्याही आम्ही संपर्कात आहोत. याबाबत रात्रीचे ‘चार्टर्ड प्लेन’ फिरतात, हे खरे आहे. बारामतीला या विमानाचे ट्रेनिंग सेंटर आहे, ते सुद्धा लाईटमुळे उंचावर असताना ड्रोन सारखेच दिसतात.

जास्त खोल माहिती काढली असता, आता अमेझॉन, फ्लिपकार्ट यावरसुद्धा ड्रोन खरेदी केली जाऊ शकते व अनेक लोकांनी ऑनलाइन ड्रोन खरेदी केलेले आहेत. सदर ड्रोन हे फोटोग्राफीसाठी किंवा सर्वेसाठी वापरले जात आहेत. सदरबाबत अधिकृत माहिती काढण्याचे कामकाज सुरू आहे; परंतु सदरचे ड्रोन हे चोरीसाठी वापरतात, ही बातमी अफवा आहे. ड्रोनने सर्वेक्षण करून रात्रीच्या वेळेस घरामधील काय सामान आहे, हे पाहणे अशक्य आहे. त्यामुळे लोकांना फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रशासनातर्फे विनंती करण्यात येत आहे की, कोणीही घाबरून जाऊ नये व अफवेतून कोणालाही मारहाण करू नये किंवा संशयित मिळाला तर व्यवस्थित चौकशी करावी, असे आवाहन महाडिक यांनी केले आहे.

रात्रीच्या वेळेस खोडसाळपणाने हे ड्रोन उडवत असावेत. याबाबत आम्ही सखोल माहिती घेत आहोत. आपल्या गावात किंवा परिसरात कोणाला याबाबतीत जर काही माहिती असल्यास पोलीस प्रशासनास संपर्क करावा; परंतु सर्व जनतेला विनंती करण्यात येत आहे की, कोणीही घाबरून जाऊ नये. इंटरनेटवर माहिती घेतली असता परदेशात सुद्धा अशा प्रकारचे खोडसळ प्रकार झालेले आहेत.

फलटण ग्रामीण पोलीस मोटरसायकलवर सदर भागात गस्त करत आहेत. आपल्या भागात चार-पाच किलोमीटर परिसरात असणार्‍या ड्रोनधारकांची नावे ९८२३५६२२५५ नंबरला व्हाटस्अ‍ॅप करावेत, असे आवाहनही पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी जनतेला केले आहे.


Back to top button
Don`t copy text!