दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२३ । मुंबई । भारतीय रिझर्व्ह बँकेने आज २ हजार रुपयांच्या नोटांबद्दल एक महत्त्वाची घोषणा केली. दोन हजाराची नोट चलनातून मागे घेण्याचा निर्णय RBIने जाहीर केला. या नोटा चलनातून मागे घेतल्या जात असल्या तरी त्याची कायदेशीर मान्यता कायम राहणार आहे, असेही RBIने स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी आणि बदलण्याची मुदत दिली आहे. यासोबतच २ हजार रुपयांच्या नोटा बँकांनी तात्काळ प्रभावने देणं बंद करण्याचे निर्देशही रिझर्व्ह बँकेने बँकांना दिले आहेत. २३ मे पासून ग्राहकांना एकावेळी २ हजारांच्या १० म्हणजेच २० हजार रूपये मूल्याच्या नोटा बदलता येणार आहेत. २०१६ मध्ये नोटबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली होती. त्यावेळी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. या निर्णयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली.
“नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणखी एक निर्णय चुकीचा होता हे सिद्ध झाले. 2000 रुपयांच्या नोटा आता चलनातून बंद होणार. नोटाबंदीचा निर्णय घेऊन मोदी सरकारने दोन हजार रुपयांची नोट चलनात आणली होती. त्यावेळी सरकारने दावा केला होता की नेटाबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा संपेल पण ते काही झाले नाही. पंतप्रधानांनी नोटबंदी वेळी केलेले सर्व दावे फोल ठरले आहेत नोटाबंदीचा एकही उद्देश सफल झाला नाही. उलट रांगेत शेकडो लोकांचे मृत्यू झाले लाखो छोटे उद्योग बंद झाले, अनेकांच्या नोक-या गेल्या कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले. आता कुठे या धक्क्यातून अर्थव्यवस्था सावरत होती, तोवर मोदी सरकारने पुन्हा दोन हजार रुपयांची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा प्रश्न पडला आहे की दोन हजारांची नोट बंद करायची होती तर चलनात आणलीच कशाला?” असा रोखठोक सवाल नाना पटोलेंनी केला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लहरी राजाप्रमाणे वागत आहेत त्यांना अर्थव्यवस्थेचे काही ज्ञान आहे असे त्यांच्या निर्णयावरून वाटतं नाही. कसलाही अभ्यास नाही वस्तुस्थितीचे भान नाही परिणामांची चिंता नाही फक्त आपल्याला वाटते म्हणून काहीही निर्णय घेणे ही पंतप्रधानांची हुकुमशाही मनोवृत्ती आहे हे दिसून येते,” असेही पटोले म्हणाले.