राजधानी टॉवरमधील बेकायदेशीर बांधकाम न काढल्यास दि.28 पासून मुख्याधिकार्‍यांच्या दालनात धरणे आंदोलन : अशोकराव जाधव

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, फलटण, दि.२५: फलटण शहरातील फलटण नगरपालिकेकडून बांधण्यात आलेल्या राजधानी टॉवरमधील बेकायदेशीर बांधकाम येत्या दोन दिवसात न हटवल्यास सोमवार, दिनांक 28 जून पासून सर्व विरोधी नगरसेवकांसह मुख्याधिकार्‍यांच्या दालनात धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा, फलटण नगरपरिषदेचे गटनेते अशोक जाधव यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आले असून यावेळी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, सचिन अहिवळे, डॉ.प्रविण आगवणे उपस्थित होते.

फलटण नगरपरिषदेच्या राजधानी टॉवरमधील अनियमित बांधकाबाबत आंदोलनाची नोटीस दिनांक 1 जून रोजी आम्ही दिली होती. त्यावर मुख्याधिकार्‍यांनी 20 दिवसात संबंधित कार्यालयाची परवानगी न मिळाल्यास सत्वर कारवाई करु असे आश्‍वासन दिले होते. याबाबत दिनांक 21 जून रोजी मुख्याधिकार्‍यांकडे विचारणा केली असता सहाय्यक संचालक नगररचना, सातारा यांनी दिनांक 18 जून रोजीच्या पत्राने बांधकामास परवानगी दिली असल्याचे मुख्याधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. तथापी, दिनांक 23 जून रोजी सहाय्यक संचालक, नगररचना, सातारा यांनी दिनांक 18 जून रोजी दिलेली परवानगी रद्द समजण्यात यावी असे पत्र मुख्याधिकार्‍यांना व आम्हाला दिले आहे. त्यावरुन सदरचे बांधकाम हे बेकायदा असल्याचे सिद्ध होत असून येत्या दोन दिवसात ते न हटवल्यास सोमवार, दिनांक 28 जून पासून सर्व विरोधी नगरसेवक फलटण पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांच्या दालनात बांधकाम काढले जात नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलनास बसणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असल्याचे, अशोक जाधव यांनी सांगितले.

Back to top button
Don`t copy text!