प्रत्येकाने नागरिक म्हणून कर्तव्य पालन केल्यास जीवनमान उन्नत होईल – राज्यपाल रमेश बैस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२३ । मुंबई । नागरिकांच्या दैनंदिन जीवनाची सुलभता वाढविण्यासाठी शासनाची भूमिका निश्चितच महत्त्वाची आहे. परंतु, सुशासनासाठी समाजाचा आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. ‘हा देश माझा आहे’ आणि ‘हे शहर माझे आहे’ ही भावना ठेवून प्रत्येकाने नागरी कर्तव्याचे पालन केल्यास एकूणच समाजाचे जीवनमान उन्नत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

इंडियन मर्चंट चेंबरतर्फे आयोजित तिसऱ्या ‘इज ऑफ लिविंग: नागरिकांचा मूलभूत अधिकार’ या विषयावरील परिषदेचे उद्घाटन राज्यपाल श्री.बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

उद्घाटन सत्राला इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष अनंत सिंघानिया, पदनिर्देशित अध्यक्ष डॉ. समीर सोमैया, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व ‘आयएमसी – इज ऑफ लिविंग समिती’चे अध्यक्ष एम के चौहान, वरिष्ठ शासकीय व नागरी सेवा अधिकारी तसेच उद्योजक प्रामुख्याने उपस्थित होते.

सुशासनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे असे सांगताना राज्यपालांनी सार्वजनिक हिताच्या कार्यात मुंबईतील दानशूर उद्योजकांनी केलेल्या कार्याची जंत्री सादर केली.

जमशेद जीजीभॉय यांच्या दातृत्वामुळे जे जे हॉस्पिटल निर्माण झाले तर ससून कुटुंबियांमुळे डेव्हिड ससून वाचनालय उभे राहिले. नाना शंकरशेट यांच्या दातृत्वामुळे निर्माण झालेली स्मशानभूमी आजही समाजाला सेवा देत आहे असे सांगून कॉर्पोरेट जगताने महिलांसाठी अधिक स्वच्छतागृहे निर्माण करावी असे आवाहन राज्यपालांनी केले.

मुंबईतील रस्ते सुधारावे

जनसामान्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मुंबईतील रस्ते सुधारण्याची गरज आहे.मुंबई शहरात रस्ते सदैव वाहतुकीने भरलेले असतात, लोकल ट्रेनमध्ये गर्दी असते. हा भर कमी होण्यासाठी जलवाहतून सुरु झाली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

देशात ‘स्मार्ट सिटी’ संकल्पना येण्यापूर्वीच ‘नया रायपूर’ हे स्मार्ट शहर निर्माण झाले व त्याठिकाणची जीवनमान सुधारले असे त्यांनी सांगितले.

कॉर्पोरेट रुग्णालयांनी एक दिवस जनता ओपीडी सुरु करावी

आज अनेक कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत. त्यांनी जनसामान्यांसाठी किमान एक दिवस निःशुल्क सेवा दिली तर सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असे राज्यपालांनी सांगितले.

जीवनस्तर उंचावण्यासाठी नागरिकांची सुरक्षा महत्वाची : विवेक फणसळकर

जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे असे सांगताना नागरिकांनी मूलभूत कर्तव्यांचे पालन केल्यास पोलिसांचेही काम सुलभ होईल असे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

पोलिसांकडे समाजातील सर्व लोकांकडून वेगवेगळ्या तक्रारी येतात परंतु पोलीस दलाशी संबंधित नसून देखील पोलीस लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात असे त्यांनी सांगितले. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये लोक अनेकदा परस्पर सहकार्य करत नाही व तक्रारी पोलिसांपर्यंत येतात या विरोधाभासाकडे त्यांनी लक्ष वेधले. आर्थिक गुन्हे, सायबर गुन्हे वाढत आहेत तसेच वाढत्या वाहन संख्येमुळे रस्त्यांवरील ताण देखील असह्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष अनंत सिंघानिया यांनी प्रास्ताविक केले तर आयएमसी इज ऑफ लिव्हिंग परिषदेचे अध्यक्ष एम के चौहान यांनी परिषदेच्या आयोजनामागची पार्श्वभूमी विशद केली.


Back to top button
Don`t copy text!