पाटण कृषि उत्पन्न बाजार समितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा


दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२३ । सातारा । पाटण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधिक्षक समीर शेख, पणन मंडळाचे संचालक विनायक कोकरे, पणन मंडळ कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ.सुभाष घुले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मनोहर माळी, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव हरिष सूर्यवंशी, जिल्हा पणन अधिकारी प्रसाद भुजबळ आदी उपस्थित होते.

पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यामातून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात याविषयी माहिती घेऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, बाजार समितीसाठी तातडीने कोणत्या सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात याविषयीचा अहवाल सादर करावा. तसेच शीतगृह सारखी सुविधा उभारण्यात यावी. तालुक्यात आंबा, फणस यासारखी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. तालुक्यातील वातावरणही त्यास पोषक आहे. याचा विचार करून आंब्यासाठी सोयी निर्माण कराव्यात. बाजार समितीचे उत्पन्न वाढवण्यासाठी काय करता येईल याविषयी कृषि पणन मंडळ व कृषि अधिक्षक कार्यालयाने समन्वयाने काम करुन अहवाल सादर करावा. मल्हारपेठ येथे चांगले मार्केट उभारण्याचा आराखडा तयार करावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!