राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत आयडियल स्कूलची लक्षवेधी कामगिरी; अंतिम फेरी गाठत जिंकली सर्वांची मने

जळगाव येथे झालेल्या महाइंडोर राज्य अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत फलटणच्या आयडियल इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने अंतिम फेरी गाठून लक्षवेधी कामगिरी केली.

स्थैर्य, फलटण, दि. १९ ऑगस्ट : जळगाव येथे पार पडलेल्या महाइंडोर राज्य अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत फलटणच्या आयडियल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या १३ वर्षांखालील संघाने सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत लक्षवेधी कामगिरी केली आहे. उत्कृष्ट खेळाच्या जोरावर या संघाने थेट अंतिम फेरीत धडक मारत क्रीडा रसिकांची मने जिंकली.

अटीतटीच्या लढतीत उत्कृष्ट खेळाचे दर्शन

अंतिम सामन्यात आयडियल इंटरनॅशनल स्कूलच्या संघाची महाराष्ट्र ‘क’ संघाशी अत्यंत चुरशीची लढत झाली. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला होता. या अटीतटीच्या सामन्यात आयडियलच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला असला तरी, राज्यस्तरीय स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचत संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाची आणि सांघिक क्षमतेची प्रभावी छाप पाडली.

संस्थापक आणि मान्यवरांकडून विशेष कौतुक

या स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या संस्थापिका डॉ. वैशाली शिंदे स्वतः उपस्थित होत्या. त्यांच्यासह श्रद्धा शहा, प्रशिक्षक शुभदा झणझणे आणि चैतन्य शिंदे यांनी संघाला मार्गदर्शन केले. महाइंडोर क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष क्षितिज वेदक यांनी आयडियल स्कूलच्या संघाच्या उत्कृष्ट कामगिरीची विशेष दखल घेत त्यांच्या जिद्दीचे आणि शिस्तबद्ध खेळाचे विशेष कौतुक केले.

Back to top button
Don`t copy text!