लोकसेवेच्या संधीचे सोने करीन : ललिता बाबर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, दहिवडी, दि.३०: ऑलिंपियन धावपटू ललिता बाबर यांची माणगावच्या (जि. रायगड) परिविक्षाधिन तहसीलदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. माण तालुक्‍यातील मोही गावच्या सुकन्या असणाऱ्या ललिता बाबर यांनी आपल्या अंगभूत कौशल्य व जिद्दीच्या बळावर संपूर्ण जगात देशाची मान उंचावली आहे.

सुरुवातीला खो- खो खेळणाऱ्या ललिता यांच्यातील चपळपणा पाहून त्यांच्या शिक्षकांनी त्यांना धावण्याकडे वळविले. पंधराशे मीटर धावण्याच्या शर्यतीपासून सुरुवात करून त्यांनी मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. सलग तीन वेळा त्यांनी मुंबई मॅरेथॉन जिंकली आहे. मॅरेथॉननंतर त्यांनी अनेकांना नावही माहिती नसलेल्या 3000 मीटर स्टीपलचेस या खेळाकडे आपला मोर्चा वळवला. या खेळातही त्यांनी आपला ठसा उमटविला. राष्ट्रीय विक्रम तर त्यांनी नोंदवलाच; पण जखमी असूनही रिओ दी जानरो येथे 2016 मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत पहिल्या दहामध्ये येण्याचा पराक्रम केला.

त्यांच्या खेळातील या योगदानाबद्दल त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीने (फिक्कीने) आणि भारताच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाने 2015चा स्पोर्टस पर्सन ऑफ दी ईयर हा पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता. त्यामुळे राज्य शासनाने क्रीडा कोट्यातून त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड केली आहे.

29 सप्टेंबर 2019 पासून त्यांचे विविध ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे. प्रत्यक्ष काम करण्यासाठी म्हणून त्यांची माणगावच्या परिक्षाविधिन तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नंतर त्यांची परिविक्षाधिन प्रांताधिकारी म्हणून नेमणूक होईल. त्यानंतर त्यांना प्रांताधिकारी पदाचा पदभार देण्यात येईल. त्यांनी नुकताच माणगाव तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!