स्थैर्य , बीड, दि . २६: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर राज्यभर खळबळ माजली होती. विरोधकांनी मुंडेंवर टीका केल्या होत्या. परंतु, काही दिवसानंतर त्या महिलेने आपली तक्रार मागे घेतली. यावर धनंजय मुंडे काय बोलणार, याची सर्वजण प्रतिक्षा करत होते. अखेर आज धनंजय मुंडे यांनी मौन सोडले आहे.
प्रसार माध्यमाशी संवाद साधताना धनंजय मुंडे म्हणाले की, “देवाचा प्रसाद असतो, तसे तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. अशा कठीण प्रसंगामध्ये तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी उभे राहून दिलेल्या साथीबद्दल मी शब्दात आभार मानू शकत नाही. आपल्या उपकाराची परतफेड माझ्या अंगावरील कातड्याची जोडे करून जरी आपल्याला घातली तरीही ती फिटू शकत नाही. आजपर्यंत मी अनेक संकटांना सामोरे गेलो आहे. सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करून आज इथपर्यंत पोहोचलो आहे’, अशी प्रतिक्रिया मुंडेंनी दिली.
काय आहे प्रकरण?
रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप लावले होते. त्यांनी याबाबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रारदेखील नोंदवली होती. यानंतर मुंडे यांनी सोशल मीडियावरुन याबाबत सर्व खुलासा केला होता. अखेर काही दिवसानंतर त्या महिलेने आपली तक्रार मागे घेतली.