दैनिक स्थैर्य । दि. १३ एप्रिल २०२३ । मुंबई । येणाऱ्या विधानसभा निवडणुकीअगोदर राष्ट्रवादी-काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक इशारा दिला आहे.
आमच्या संपर्कात अजुनही अनेक आमदार आहेत. पक्षाची गरज कधीच संपत नाही. काही मतदारसंघ असे आहेत तिथे आम्ही अजुनही पोहोचलेले नाही. त्यामुळे तिथेही पोहोचायला मिळाले तर चांगलच आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे राज्यात या चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांनी मात्र आपण कुठेच जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, अंजली दमानिया यांनी हे मत मांडलं असेल. ते त्यांच वैयक्तिक मत असेल. त्या तुमच्याशी कुठे बोलल्या माहित नाही. या चर्चा फक्त माध्यमात आहेत. मी गॉसीमध्ये लक्ष देत नाही, आम्हाला मतदार संघात काम करायच आहे.