हॉटेल व्यावसायिक कोमात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १३ : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यात गेल्या साडेतीन महिन्यांपासून पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आल्यामुळे संबंधित पालिका व संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. जिल्ह्यासह पर्यटनस्थळांवर असलेली हॉटेल अद्याप सुरू न झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिक अक्षरशः कोमात गेले असून पर्यटनस्थळावर असणार्‍या टपर्‍या, गाडेचालक भूमिपुत्रांवर रोजंदारीवर जाण्याची वेळ आली आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगा लाभलेल्या सातारा जिल्ह्यात पाचगणी, महाबळेश्‍वर, कास, ठोसेघर, कोयनानगर, नवजा, सांडवली, सडा वाघापूर ही ठिकाणे प्रामुख्याने पर्यटनस्थळे म्हणून ओळखले जातात. यापैकी पाचगणी, महाबळेश्‍वर, कास, ठोसेघर, कोयनानगर येथे पर्यटक वर्षभर भेटी देत असतात. त्यामुळे या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसाय केले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने भूमिपुत्रांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. कास, ठोसेघर या ठिकाणी हॉटेलांची संख्या कमी असली तरी तेथे स्थानिक युवक टपर्‍या, गाडे यांच्या माध्यमातून वडापाव, कांदा भजी, बटाटा भजी, मिसळ, पुरी- भाजी, अंडा भुर्जी, उत्तप्पा, चहा, कॉफी आदी विक्रीचा व्यवसाय करत असतात.

पर्यटनस्थळी विशेषतः सुट्टीच्या कालावधीत म्हणजेच एप्रिल आणि मे या दोन महिन्यासह जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. यावर्षी मात्र मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सातारा जिल्ह्यात  करोनाने शिरकाव केल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पर्यटन स्थळांसह हॉटेल बंद ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत पर्यटनस्थळे, हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत.

मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात पाचगणी, महाबळेश्‍वर या थंड हवेच्या ठिकाणी सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि परदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे प्रवासी करआकारणीच्या माध्यमातून पाचगणी, महाबळेश्‍वर नगरपालिकांना लाखो रुपयांचा कर प्राप्त होतो. याच तीन महिन्यात तेथील हॉटेल व्यावसायिक अक्षरशः मालामाल होतात.  करोनाने मात्र यावर्षी पर्यटनस्थळांसह हॉटेल व्यवसाय धोक्यात आणले. पाचगणी, महाबळेश्‍वर ही पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे अन्य दुकान चालकांचेही फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

कास पठाराची गणना जागतिक वारसामध्ये झाल्यामुळे या ठिकाणी पर्यटक, पर्यावरणप्रेमी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. कास जलाशय परिसरात तेथील स्थानिक भूमिपुत्रांनी टपर्‍या, गाडे यांच्या माध्यमातून खाद्यपदार्थांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. गावातच रोजगार उपलब्ध झाल्यामुळे शेतीला जोड व्यवसाय प्राप्त झाला म्हणून त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते. ठोसेघर, नवजा धबधबा परिसरातही स्थानिक भूमिपुत्र खाद्यपदार्थांच्या विक्रीचा व्यवसाय करत होते. मात्र लॉकडाउनमुळे व्यवसाय तात्पुरते बंद करायला लागल्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना आज रोजंदारीवर कामाला जाण्याची वेळ आली आहे.

कास, ठोसेघर, नवजा हा परिसर वनविभागाच्या हद्दीत येत असल्यामुळे या ठिकाणी वन विभागाच्या माध्यमातून संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या पर्यटन स्थळावर येण्यासाठी माणसी शुल्कासह पार्किंग शुल्क आकारले जाते. या पर्यटनस्थळांपैकी कास संयुक्त व्यवस्था समितीला फार मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त होतो. मिळालेल्या महसुलाच्या काही टक्के निधी हा काससह अन्य गावात विकासकामांवर खर्च केला जातो. मात्र पर्यटनस्थळे बंद असल्यामुळे या विकासकामांना मोठ्या प्रमाणावर मर्यादा आल्या आहेत. थोडक्यात लॉकडाउनमुळे हॉटेल व्यावसायिक कोमात गेले असून स्थानिक भूमिपुत्रांनाही रोजंदारीच्या कामावर जावे लागत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!