दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑक्टोबर २०२३ | सातारा |
गुन्हेगारी क्षेत्रातील घटना घडल्यानंतर त्यात आरोपीला अटक होते. त्यानंतर संबंधित गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होईपर्यंत गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी, तपासात मदत करणारे पोलीस अंमलदार, दोषारोप पत्र कोर्टात दाखल झाल्यावर आरोपीला शिक्षा लागेपर्यत न्यायालयात पाठपुरावा करणारे सहसा समाजासमोर येत नाहीत. त्यांचे योगदान, परिश्रम याची दखल घेण्याचे काम सातारा पोलीस दलात पहिल्यांदाच झाले असून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील अधिकारी व पैरवी अधिकार्यांना ३ लाख १० हजार रुपयांचे बक्षीस व प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांच्या प्रामाणिक सेवेचा पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी गौरव केला आहे.
सन्मान करण्यात आलेल्यांमध्ये फलटण शहर पोलीस ठाण्यातील तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक एस. सी. मुंढे, दप्तरी पोलीस हवालदार एन. पी. भोसले, प्रभारी पोलीस निरीक्षक डी. आर. पवार, पैरवी अधिकारी सहा. फौजदार एस. एस. पाटील यांचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख यावेळी बोलताना म्हणाले की, सातारा पोलीस दलामध्ये जिल्हयामध्ये गुन्हा सिध्दीचे प्रमाण वाढण्याचे दृष्टीने पोलीस दलामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या दृष्टीने तपास अधिकारी व अंमलदार, पैरवी अधिकारी यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी बक्षीस म्हणून रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्याचा उपक्रम राबवला. या उपक्रमांमुळे भविष्यात पोलीस अधिकारी व अंमलदार आपले नैसर्गिक व अभिजात गुण कौशल्याचा इष्टतम वापर करून गुन्हयाचा दर्जात्मक व उत्कृष्टरित्या तपास करुन गुन्हे सिध्द होण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन मिळणार आहे.
नोव्हेंबर २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीतील खून, खुनाचा प्रयत्न, बालकांवरील अत्याचार, ठकबाजी, महिलांवरील अत्याचार, हलगर्जीमुळे मृत्यु, गंभीर दुखापत इत्यादी गुन्हयांमध्ये दोषसिध्दी मिळालेल्या उल्लेखनिय गुन्हयांमध्ये फलटण शहर, उंब्रज, सातारा शहर, शाहुपूरी, कराड शहर, कराड तालुका, मेढा, भुईंज, वडुज, ढेबेवाडी या पोलीस ठाणेतील तपासी अधिकारी, पैरवी अधिकारी, पोलीस अंमलदार यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देवुन गौरवण्यात आलेले आहे. त्यापैकी विशेष उल्लेखनिय कामगिरी म्हणजे ढेबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्हयामध्ये आरोपींस भांदविस कलम ३०२, २०१ व ३७६ प्रमाणे फाशीची शिक्षा दिली, पोक्सो कलम ४ व ५ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास व १ लाख रुपये दंड, तसेच वडुज पोलीस ठाणेमध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्हयामध्ये दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.