ग्रामीण पत्रकारितेतला मानबिंदू : स्वर्गीय आर. के. निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र किसनराव तथा आर. के. निंबाळकर यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. स्व. आर. के. निंबाळकर यांनी आपल्या जीवनकार्यात वृत्तपत्र क्षेत्रासह, शेती, शेतकरी, सहकार क्षेत्रातील समस्या समाजासमोर आणून त्यांचा पाठपुरावा केला. आर. के. निंबाळकर यांच्या या कार्याचा त्यांच्या जयंतीनिमित्त घेतलेला थोडक्यात आढावा…

आर. के. निंबाळकर हे फलटण तालुक्यातील पत्रकार संघात आपल्या कामाने एक आदराचे स्थान मिळवून होते. त्यांनी फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना करून ग्रामीण पत्रकारितेला एक दर्जा मिळवून दिला. त्यामुळे ग्रामीण पत्रकार त्यांचे कायम ऋणी राहतील.

फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून काम करताना तसेच विविध वृत्तपत्रांचे ग्रामीण भागातील वार्ताहर म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण भागातील प्रश्नांची विशेषत: शेती, शेतकरी, सहकार क्षेत्रातील समस्या प्रशासनासमोर मांडून त्या तडीस जाईपर्यंत वृत्तपत्रांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला.

शेतीविषयक समस्या, त्याबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्यासाठी ‘अर्पिता प्रकाशन संस्थेची स्थापना करून त्यामाध्यमातून कॅलेंडर, डायरी, पुस्तके प्रकाशित केली. त्याद्वारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

राजाळे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी गावातील तरुणांना एकत्र करून ‘रसिक कला क्रीडा मंच’ या संस्थेची स्थापना केली. सलग १५ वर्षे त्यामाध्यमातून व्याख्यानमालेचे आयोजन केले. विविध क्षेत्रातील विचारवंतांना राजाळे येथे आणून पंचक्रोशीतील ग्रामस्थांना त्यांचे विचार ऐकण्याची एक नामी संधी उपलब्ध करून दिली.

फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून ग्रामीण पत्रकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यातून विविध प्रश्न प्रशासनासमोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

असे विविध क्षेत्रात आर. के. निंबाळकर यांनी ठसा उमटविणारे काम करून पत्रकारितेतला एक आदर्श निर्माण केला आहे. आर. के. निंबाळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

दरम्यान, स्वर्गीय आर. के. निंबाळकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘स्वर्गीय आर. के. स्मृती प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली असून या प्रतिष्ठानमार्फत सामाजिक कार्य केले जाणार आहे, असे प्रतिष्ठानच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!