स्थैर्य, हिंगोली, दि.१२: औंढा नागनाथ तालुक्यातील उमरा शिवारात दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी (ता.१२) पहाटे शोध मोहिम सुरु केली. यामध्ये तीन शेतात गांजाची झाडे आढळून आले असून परिसरात आणखी शेतातील तुरीच्या पिकांची पाहणी केली जात आहे. त्यामुळे गांजाच्या शेतीचा प्रकार या भागात मोठ्या प्रमाणावर सुरु असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील उमरा शिवारातील एका शेतात तुरीच्या ओळीत गांजाची झाडे असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक रामेश्वर वैंजने, सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, उपनिरीक्षक सविता बोधनकर, जमादार रुपेश धाबे, महेश बंडे, अर्जुन पडघन यांच्या पथकाने आज पहाटेच शेतात पाहणी केली. यामध्ये एका शेतात तुरीच्या ओळीमध्ये गांजीची झाडे लावल्याचे आढळून आले. साधारणतः चार ते साडेचार फुट उंचीची हि झाडे आहेत.
पोलिसांनी संबधीत शेतकऱ्यास ताब्यात घेतल्यानंतर परिसरात आणखी काही शेतात झाडे असल्याने त्याने सांगितले. त्यावरून पोलिसांनी आता उमरा शिवार पिंजून काढण्यास सुरवात केली असून अन्य दोन ठिकाणी गांजाची झाडे आढळून आली आहेत. या प्रकरणात तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची चाैकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिकडे, वसमत तालूक्यातील हट्टा शिवारामध्ये देखील एका शेतातून गांजाची झाडे जप्त केली आहेत. त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत एकूण चार ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत
गांजाची झाडे उपटून वजन करणार ः ओमकांत चिंचोलकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दहशतवाद विरोधी पथक हिंगोली
सध्या उमरा परिसरात किती शेतात गांजाची झाडे आहेत याचा शोध घेतला जात आहे. साधारणतः जून महिन्यातच तुरीच्या पिकाच्या पेरणीच्या वेळी हि झाडे लावण्यात आली असावीत. या शेतातील झाडे उपटून त्याचे वजन केले जाणार आहे. त्यानंतरच नेमका किती किलो गांजा आहे व त्याची अंदाजे किंमत कळणार आहे. मात्र एका शेतात वीस किलो गांजा असावा असा अंदाज आहे.