‘उच्च कोटीचे यश’ हीच कष्टाची पावती होय – प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २० मार्च २०२४ | फलटण |
विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळवलेले उच्च कोटीचे यश हीच त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाची पावती होय, असे विधान मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार यांनी गोंदवले बु. येथे व्यक्त केले.

नवचैतन्य हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गोंदवले बुद्रुक यांनी आयोजित केलेल्या संत गाडगेबाबा जयंती अभिवादन या कार्यक्रमात डॉ. प्रभाकर पवार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शाळा समिती सदस्य श्री. धनंजयराव पाटील हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये श्री. पी. डी. वाघमोडे, संतोष ढोले, दौलतराव नवले, पीएम शिंदे, प्राचार्य सुधीर अहिवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. प्रभाकर पवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या मातीला व मातेला विसरता कामा नये आणि ज्या प्रशालेत शिकलो, घडलो, वाढलो, त्या प्रशालेला न विसरता प्रशालेचे नाव मोठे केले पाहिजे. आपण कोणत्याही क्षेत्रात जा तिथे तन-मन-धन अर्पूण काम करा. संयम, चिकाटी आणि कष्ट याच्या जोरावर उच्चप्रतीचे यश खेचून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. मिळणारे यश हे तुमचेच असेल. स्वप्ने मोठी बघा, छोटी-छोटी स्वप्ने बघणे हा गुन्हा आहे. आपला माणदेश जरी दुष्काळी भाग असला तरी, वाळवंटातच हिरवे मळे फुलवण्यासाठी व आपल्या मातीची शान राखण्यासाठी थोरामोठ्यांचे आदर्श व प्रेरणा डोळ्यांसमोर ठेवा, असेही दहावीच्या मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा देताना डॉ. प्रभाकर पवार यांनी आवर्जून सांगितले.

अध्यक्षपदावरून बोलताना श्री. धनाजीराव पाटील म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी योग्य वापर केला पाहिजे. अभ्यास, चिंतन, मनन करून परीक्षा देऊन उच्च प्रतीचे यश मिळवले पाहिजे.

यावेळी दहावीच्या वर्गातील कु. प्राची जाधव, कु. दिशा भोसले, कु. नंदिनी कदम, कु.संचिता पाटोळे, कु. रिया कट्टे, कु. श्रुती तिवाटणे, श्री. अथर्व नवले, श्री. हर्ष रणपिसे इ. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक प्राचार्य सुधीर अहिवळे यांनी केले. श्री. शरद कणसे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. पोपट यादव यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

कार्यक्रमाला पर्यवेक्षक पोपट यादव, श्री. गोरख टेंबरे, श्री. महादेव यादव, सौ. वनिता गायकवाड, श्री. नानासाहेब तांबे, श्री. विठ्ठल काकडे, श्री. शिवलिंग सावंत, सौ. सुनीता जाधव आदी दहावीच्या वर्गातील शिक्षक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!