कराड शहरासह परिसरातील मलकापूर, सैदापूर, ओगलेवाडी विभागास मुसळधार पावसाने झोडपले


स्थैर्य, कराड, दि. १२ : कराड शहरासह परिसरातील मलकापूर, सैदापूर, ओगलेवाडी विभागास  रात्री मुसळधार पावसाने झोडपले. या पावसाने शहर व परिसरातील अनेक तळमजल्यातील दुकान गाळ्यांत तसेच घरांमध्ये पावसाने पाणी शिरून नुकसान झाले. कराड-ओगलेवाडी रस्त्यावर विद्यानगर येथे गुडघाभर पाणी साचल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली तसेच परिसरातील ऊस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जोरदार वार्‍यासह या पावसात सुरुवात झाली. या पावसाचा जोर इतका होता, की शहरातील सखल भागात  व बुधवार पेठ, पोपटभाई पेट्रोल पंप आदी भागातील रस्त्यावर सुमारे तीन ते साडेतीन फूट पाणी साचून राहिले होते तसेच अनेक तळमजल्यातील दुकान गाळे तसेच अनेक घरांमध्ये देखील पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले.  कृष्णा कॅनॉलपासून ओगलेवाडी मळावॉर्ड पर्यंतच्या रस्त्याच्या कडेच्या व अण्णासाहेब नांगरे नगरमधील अनेक घरात पुन्हा एकदा पाणी शिरल्याने  रहिवासी वैगातले. घरात पाणी शिरल्याने त्यांना पाऊस बंद होण्याची वाट पहात रात्र जागून काढावी लागली. प्रत्येक पाव-साळ्यात हीच परिस्थिती होत असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्रशासन यावर काहीच उपाययोजना करीत नसल्याने वाहनचालक व रहिवाशांतून संताप व्यक्त होत आहे. या पावसामुळे विद्यानगर येथीही रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात दुसर्‍यांदा रस्त्यावर व रस्त्याकडेच्या घरात पाणी साचल्याने लोकांतून संताप व्यक्त होत आहे. प्रत्येक पावसात रस्त्यात पाणी साचत असल्याने रस्त्यात मोठे खड्डे, त्यातच गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसून पाण्यातून वाट काढताना विशेषत: दुचाकी वाहनचालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. पाण्यातून वाहने बंद पडण्याच्याही घटना घडत आहेत. कराड शहर परिसरातील ओगलेवाडी, मलकापूर, सैदापूर, कोपर्डे हवेली येथील अनेक भागातील ऊस या वादळी पावसाने भुईसपाट झाला  तसेच हातातोंडाला आलेल्या कडधान्य पिकासह ऊसपीक भुईसपाट होऊन  मोठे नुकसान झाले. एकीकडे कोरोनाचा वाढता कहर तर दुसरीकडे निसर्गाच्या अवकृपेत भरडलेला बळीराजा यामुळे हवालदिल झाला आहे.

रात्री झालेल्या या मुसळधार पावसामुळे कराड येथील कराड कोविड हॉस्पिटलमध्ये पाणी शिरले. दरम्यान, या रुग्णालयातील अनेक वैद्यकीय सेवक कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे या हॉस्पिटल प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या पावसाने पाणी हॉस्पिटलमध्ये या अडचणीत भर पडली.  सकाळी हे शिरलेले पाणी काढण्यात आले.

कृष्णा कॅनॉलपासून ओगलेवाडीपर्यंतच्या रस्त्यावरील पाणी वाहून जाण्याची सोयच नसल्याने रस्त्यात पाणी साचत आहे तर रस्त्याच्या कडेला असलेल्या नांगरे नगर तसेच अनेक कॉलन्या व सोसायट्यांमधील घरांत पावसाचे पाणी शिरत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की या परिसरात रहाणार्‍या लोकांच्या अंगावर काटा येत आहे. गुरुवारच्या पावसानेही घरात व दुकानात पाणी शिरले आहे. त्यामुळे लोकांना रात्र जागून काढावी लागली आहे. पावसाचे गटर व शेतातून वाहत आलेले दुर्गंधीयुक्त पाणी घरात साचल्याने साथरोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. घरातील साहित्याचेेही यामुळे मोठे नुकसान झाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!