सकस आहार व नियमित व्यायामातून हाडांचे विकार टाळणे शक्य: डॉ.प्रसाद जोशी; झी – 24 तास वरील विशेष मुलाखतीत दिला ‘आरोग्य हीच संपत्ती’चा संदेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, फलटण, दि.१७: पूर्वी सर्वसामान्यपणे वयाच्या साठीनंतर सांधेदुखीचा आजार आढळून यायचा. पण सध्या अन्नप्रक्रियेत कीटकनाशकांचा वाढता वापर, व्यायामाचा अभाव, व्यसनाधिनता यामुळे अनेकांना कमी वयातच सांधेदुखीचे विकार आढळून येत आहेत. आपले आरोग्य हीच आपली बहुमोल संपत्ती आहे, हे प्रत्येकाने लक्षात घेवून सेंद्रीय पद्धतीने पिकवलेले सकस व मोजके अन्न खावे. नियमीत व्यायाम करावा. यातून सांधेदुखीचा विकार टाळणे सहज शक्य आहे, असा मौलिक सल्ला फलटण येथील सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ.प्रसाद जोशी यांनी दिला. 

‘हाडांचे आणि सांध्यांचे विकार व उपचार’ या विषयावर झी – 24 तास वृत्तवाहिनीने घेतलेल्या विशेष मुलाखतीत डॉ.जोशी बोलत होते. 

यावेळी बोलताना डॉ.जोशी म्हणाले, प्रामुख्याने वयोमानानुसार होणारी सांधेदुखी, संधीवात, हाडाला पूर्वी लागलेला मार, अंर्तस्त्रावातील बिघाडामुळे जडलेली सांधेदुखी असे सांधेदुखीचे प्रकार आढळतात. तरुणपणी सांध्यांमध्ये गुळगुळीत कवच असते. जसजसे वय वाढते तसतसे या कवचामध्ये खड्डे पडून हे कवच खडबडीत व्हायला सुरुवात होते. सांध्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यासदेखील हे कवच हळूहळू खराब होते. त्यामुळे सांधा एकमेकांवर घासायला सुरुवात होवून त्यातून दाह निर्माण होतो. साध्यांला सूज येते व यातून रुग्णांना वेदना सुरु होतात. यातून रुग्णाच्या हालचालींवर प्रचंड मर्यादा येतात.

सांधेदुखीवर प्राथमिक उपचार करुनही वेदना न थांबल्यास कृत्रिम सांधेरोपण करावे लागते. या उपचार पद्धतीबाबत कोणीही भिती बाळगायचे काहीच कारण नाही. वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञान खुप बदलले आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी वेळात अचूक सांधेरोपण करणे शक्य झाले आहे. कृत्रिम सांधेरोपणातून सांधेदुखीच्या वेदना 100% जातात. सांध्यांची कार्यक्षमता वाढते. सांधेरोपणानंतर व्यायाम पुन्हा सुरु करुन आरोग्यदायी आयुष्य जगता येते. रुग्णाला एकप्रकारे यातून पुर्नजीवन मिळते, असेही डॉ.प्रसाद जोशी यांनी यावेळी स्पष्ट केले.

बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, व्यसनाधिनता व अन्ननिर्मिती प्रक्रियेत वाढता रसायनांचा वापर यामुळे हाडे ठिसूळ होवून गुडघे, मणका, खुबा यांचे विकार अनेकांना कमी वयातच जडत आहेत. आपलं जीवन आपल्या हाती आहे, आरोग्य हीच आपली मौलिक संपत्ती आहे हे लक्षात घेवून प्रत्येकाने नित्यनियमाने व्यायाम करावा, सेंद्रीय, सकस व मोजका आहार घ्यावा, पाणी भरपूर प्यावे, व्यसनांपासून दूर रहावे व शरीरसंपत्तीची काळजी घ्यावी, असा सल्लाही या मुलाखतीच्या माध्यमातून डॉ.प्रसाद जोशी यांनी दिला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!