संपामुळे आरोग्य यंत्रणा ठप्प होणे; साथ रोग नियंत्रणासाठी धोकादायक ठरु शकते


दैनिक स्थैर्य | दि. १७ मार्च २०२३ | फलटण | आरोग्य खात्यांतर्गत फलटण तालुक्यातील प्रा. आरोग्य केंद्रे, आरोग्य उप केंद्रे आणि उप जिल्हा रुग्णालयातील जवळपास सर्वच कर्मचारी राज्यस्तरीय सरकारी कर्मचारी संपात सहभागी झाल्याने संप लांबल्यास शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेशा आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी निर्माण होऊन विशेषतः ग्रामीण भागातील वृध्द, महिला, लहान मुले यांना वैद्यकिय उपचार मिळाले नाहीत तर गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका व्यक्त होत आहे.

फलटण तालुक्यात ७ प्रा. आरोग्य केंद्र, ३५ आरोग्य उप केंद्र आणि ५० बेडचे उप जिल्हा रुग्णालय आहे. यामध्ये १०५ नियमीत डॉक्टर्स व कर्मचारी, ८४ करार पद्धतीने कार्यरत असलेले कर्मचारी आणि १३ आऊट सोर्सिंग द्वारे उपलब्ध कर्मचारी आणि निंबळक, गुणवरे, आदर्की या ठिकाणी आयुर्वेदिक दवाखाने असून तेथे ३ आयुर्वेदिक वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहेत. आता यापैकी अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नियमीत डॉक्टर्स पैकी ११, आऊट सोर्सिंग पैकी ४ आणि ३ आयुर्वेदिक असे १८ डॉक्टर्स सध्या काम पहात आहेत. त्याशिवाय आरोग्य उप केंद्रामध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावरील डॉक्टर्स कार्यरत असतात ते सर्व ३५ आरोग्य उप केंद्रावर कार्यरत आहेत. सहाय्यक वैद्यकिय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, आरोग्य कर्मचारी, लॅब टेक्निशियन, वर्ग ३ सुपरवायझर आणि शिपाई या पदावरील ८० % कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

त्यामुळे उपस्थित डॉक्टर्स आणि उर्वरित २० % कर्मचाऱ्यांनी संपूर्ण तालुक्याची आरोग्य यंत्रणा सांभाळताना त्यांच्यावर प्रचंड ताण येत असून, गेल्या २/३ दिवसात बाह्यरुग्ण विभाग आणि लसीकरण व तातडीची वैद्यकिय सेवा सुरु ठेवणेही त्यांना कठीण जात आहे. कुटुंब कल्याण व लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया काम जवळपास ठप्प झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत विविध साथ रोग, कोरोना पुन्हा डोके वर काढण्याची भिती, नव्याने सुरु झालेला एच १ एन ३ सारखा विषाणू जन्य आजार, बदलत्या हवामानामुळे होणारे सर्दी, ताप, खोकला यासारखे आजार वगैरे रुग्णांना वैद्यकिय सेवा, सुविधा देताना अपुऱ्या अधिकारी, कर्मचारी संख्येमुळे उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांची होणारी कुचंबणा संपामुळे अधिक वाढत आहे. अशा परिस्थितीत हा संप लांबला तर आज कार्यरत असलेले वर्ग एक चे सर्वच खात्यातील अधिकारी दि. २८ मार्च पासून संपात सहभागी होण्याची शक्यता असून या अधिकाऱ्यांनी त्याबाबत प्राथमिक नोटीस दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्ग १ चे अधिकारी आज उपलब्ध आऊट सोर्सिंग किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून आपल्या विभागाचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, ते ही संपात सहभागी झाले तर मोठी समस्या सर्वच स्तरावर निर्माण होणार आहे.

महसूल अधिकारी, कर्मचारी नसतील तर प्रशासनात समन्वय ठेवून कामकाज चालविणारी यंत्रणा ठप्प झाल्याने सर्वांचीच मोठी अडचण होण्याचा धोका आहे. त्याच बरोबर माध्यमिक व प्राथमिक शिक्षक संपात असल्याने आता वर्षअखेर अभ्यासक्रम पूर्ण करुन घेऊन त्याची उजळणी आणि पुन्हा एप्रिल अखेर परीक्षा सुरु करणे. इयत्ता ११ वी आणि १२ वी च्या परीक्षा सध्या सुरु आहेत, त्यानंतर त्यांचे पेपर तपासणी आणि निकाल वगैरे प्रश्न निर्माण होणार आहेत. नगर परिषद कर्मचारी संपामुळे आगामी २/४ दिवसानंतर शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण होण्याचा धोका आहे. आज सुरु असलेल्या पाणी पुरवठा बंद झाला तर आणखी मोठी समस्या निर्माण होणार आहे. सध्या मार्च अखेरीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेली विविध विभागांची कर वसुली ठप्प झाली आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आर्थिक टंचाईचे संकट उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सर्व बाबींचा विचार करता कर्मचारी संघटनेने घेतलेला संपाचा निर्णय चुकीचा म्हणता येणार नाही कारण सलग २५/३० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाकडे फारसे लक्ष देता आले नाही तरी शासकीय सेवेत कार्यरत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना वृद्घापकाळात वाऱ्यावर न सोडता योग्य तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याची मागणी संपकरी कर्मचारी करीत आहेत. जुन्या पेन्शन योजनेत असलेल्या अनेक सुविधा नव्या पेन्शन योजनेत नसल्याचे मान्य करुन शासनाने योग्य समन्वयाने यातून मार्ग काढून संप लांबणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे अन्यथा सर्वानाच हे त्रासदायक ठरणारे असल्याची भिती व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!