
दैनिक स्थैर्य । 15 मे 2025। सातारा । मोती चौक ते शनिवार चौक (501 पाटी) या मार्गावरील हॉकर्सना (विक्रेत्यांना) पालिकेने व्यवसायासाठी आज राजवाडा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह (दादा) महाराज भाजी मंडईमधील जागेचा पर्याय दिला. यामुळे हॉकर्सला आता महात्मा फुले भाजी मंडई आणि राजवाडा मंडई असे दोन पर्याय उपलब्ध झाले आहेत. यावर आता हॉकर्स आणि हॉकर्स संघटना काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
मोती चौक ते शनिवार चौक (501 पाटी) या मार्गावर नो हॉकर्स झोन रद्द करावा, अशी मागणी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षपूजा बनसोडे यांनी हॉकर्ससमवेत मुख्याधिकारी अभिजित बापट यांची भेट घेत मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरच हॉकर्सला व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. बापट यांनी ही मागणी फेटाळत पालिकेने अचानक कारवाई केलेली नसून जून 2023 मध्ये नो हॉकर्स झोन करणार असल्याने त्याबाबत हरकती व सूचना मागविल्या होत्या, असे स्पष्ट केले. त्यानंतर सन 2024 मध्ये याची घोषणा केली, तरीही पुन्हा एकदा गेले एक महिन्यापूर्वी सूचना व हरकती मागविल्या. त्यावर काही व्यावसायिकांच्या, नागरिकांच्या, तसेच व्यावसायिक संघटनांच्या सूचना आल्या, तसेच हॉकर्स संघटनेने हरकती मांडल्या आहेत. त्यावर विचार करूनच हॉकर्सला राजवाडा अथवा सदाशिव पेठेतील मंडईत व्यवसायासाठी जागा देत आहोत.
या दोन्ही जागा व्यवसायासाठी अनुकूल आहेत. दोन्ही ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे हॉकर्सनी नियमांचे पालन करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बापट यांनी केले. त्यावर काही हॉकर्सनी आम्ही अनेक वर्षांपासून मोती चौकातच व्यवसाय करीत आहोत. कोणत्याही दुकानदारांची आमच्याबाबत तक्रार नसल्याचे म्हटले आहे. त्याच जागांवर आम्हाला व्यवसाय करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली; परंतु त्यास पालिका प्रशासनाने नकार दिला.