दि.१७ मे रोजी पुण्यतिथीनिमित्त पोंभुर्ले येथे होणार बाळशास्त्रींना अभिवादन


दैनिक स्थैर्य । दि. १५ मे २०२२ । फलटण । मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 176 व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार, दिनांक 17 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथील ‘दर्पण’ सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचा समारंभ महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे (दूरदृष्यप्रणालीद्वारे) व 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. कार्यक्रमास देवगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, पोंभुर्ले गावचे सरपंच सादिक डोंगरकर, सुधाकर जांभेकर, श्रावणी कंप्युटर एज्युकेशनचे प्रमुख सतीश मदभावे यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.

या समारंभाच्यानिमित्ताने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पोंभुर्ले येथील ‘दर्पण’ सभागृहात लोकशिक्षणकार कै.ग.गं.जांभेकर, मुंबई नगरीचे आद्य शिल्पकार कै.जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ, परखड संपादक कै.प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्रांचे अनावरण संपन्न होणार आहे. तसेच संस्थेच्यावतीने प्रतीवर्षी देण्यात येणार्‍या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणाही या समारंभात करण्यात येणार आहे. तरी या समारंभास पत्रकारिता, साहित्य, शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणार्‍या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष धनंजय उर्फ बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर, विजय मांडके यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!